
खालापूर : प्रतिनिधी
ईद-ए-मिलाद या सणाच्या पार्श्वभूमिवर खोपोली पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरातील वाहतूक कोंडीसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत उपस्थितांनी प्रामुख्याने वाहतुकोंडीची समस्या मांडली. शहरात रस्त्यावर नो पार्किगची व्यवस्था करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाशी चर्चा करू असे पोलीस निरीक्षक धनाजी क्षिरसागर यांनी सांगितले. बोघाटातून चुकीच्या दिशेने येणार्या वाहनांमुळे आपघात होत असल्याची तक्रार आहे, मात्र हा प्रश्न जिल्हाधिकार्यांशी निगडीत असल्याने त्यांच्या कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे, या विषयी जिल्हाधिकारी आदेश काढतील, अशी माहिती खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजीत पाटील यांनी दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक मुल्ला, शांतता कमिटी सदस्य कमाल पाटील, हामिद शेख, शिवसेना उपशहरप्रमुख दिलीप पुरी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष कांतीलाल पोरवाल, आरपीआयचे शहर अध्यक्ष चितांमण सोनावणे, जिल्हा सरचिटणीस सुरेश वाघमारे, ब्राह्मणसभा अध्यक्ष नरेंद्र हार्डीकर, डॉ. कटकदौड, मोहसिन शेख यांच्यासह शहरातील विविध संघटनेचे पदाधिकारी व नागरिक या बैठकीला उपस्थित होते.