सर्वेक्षणाला सुरुवात
पनवेल : बातमीदार
पनवेल तालुक्यात परतीच्या पावसामुळे विविध भागांत भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पनवेल कृषी अधिकार्यांनी शेतात जाऊन पिकांचे नुकसानीचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यात जवळपास 200 हेक्टर पिकाचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे पनवेल तालुक्यात भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार अमित सानप यांनी दिली आहे. आठवडाभरात हे पंचनामे पूर्ण होऊन शासनाला त्यासंबंधीचा अहवाल पाठविण्यात येईल. त्यानंतर शासनाच्या आदेशानुसार शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळेल, असेही त्यांनी सांगितले. शेतकर्यांनी संबंधित तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार पनवेलमधील जवळपास 200 हेक्टर पिकाचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली आहे. हेक्टरी शेतकर्याला सहा हजार 800 रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
कंपनीकडे विमा सादर
पनवेल तालुक्यात एकूण आठ हजार 150 हेक्टरवर भातशेतीचे पीक घेतले जाते. यापैकी काही शेती पावसामुळे पाण्याखाली गेली आहे. तालुक्यात ठिकठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस सुरू होता. पावसामुळे भाताचे पीक ओलेचिंब झाले. काही ठिकाणी भाताला कणीस फुटले आहे. जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने एक हजार 200 हेक्टर शेतीचे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे शासनाला जमा करण्यात आले आहेत. सात शेतकर्यांनी पीक विमा उतरवला होता. त्यांच्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून विमा कंपनीकडे सादर करण्यात आले आहेत.