ग्रामस्थ करताहेत महावितरण कर्मचार्यांना सहकार्य
माणगाव : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला. या वादळात अनेक ठिकाणचे विद्युत खांब आणि वीजवाहक तारा पडल्या. त्यामुळे गेल्या 25 दिवसांहून अधिक काळ माणगाव तालुक्यातील काही गावे अंधारात आहेत. या गावांतील ग्रामस्थ विशेषत: तरुण वीजपुरवठा पूर्ववत व्हावा यासाठी महावितरण कर्मचार्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत.
3 जूनपासून अंधारात गेलेल्या माणगाव तालुक्यातील वीजपुरवठा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. हा वीजपुरवठा सुरू होताना गावातील तरुणांनी घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे. आजही अनेक गावांमध्ये विद्युत कर्मचारी व ग्रामस्थ मिळून विद्युत तारा जोडणी, पोल उभारणी करताना
दिसत आहेत. लवकरच तालुक्यातील उर्वरित गावांत वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
विद्युत जोडणीचे थोडे ज्ञान मला आहे. गावात खूप दिवस वीजपुरवठा खंडित असल्याने अनेक गैरसोयी होत आहेत. त्यामुळे वीजपुरवठा पूर्ववत व्हावा यासाठी सर्व मिळून प्रयत्न करीत आहोत.
-जितेंद्र मोंडे, ग्रामस्थ
3 जूनपासून गाव अंधारात आहे. अशा वेळी गावातील ग्रामस्थांनी महावितरणच्या कर्मचार्यांना विद्युत खांब उभे करण्यासाठी मदत केली. त्यामुळे एक-दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत होईल.
-मंगेश भागडे, माणगाव