Breaking News

दुसरे बाल साहित्य संमेलन पनवेल तालुक्यात

रवी जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन भारतीय प्रबंध संस्था अहमदाबाद व स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने टीचर इनोव्हेशन अ‍ॅवॉर्ड सोलापूर येथे  बाल साहित्य संमेलनाच्या आयोजक चित्रलेखा जाधव यांना नुकताच मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी बोलताना रायगड जिल्ह्यातील बाल साहित्य संमेलनाचा लाभ शालेय विद्यार्थ्यांना झालेला दिसून येत आहे. आज मुले कथा, कविता आणि चारोळ्या लिहून शाळेत शिक्षकांना दाखवत असतात. त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अशी संमेलने भरवणे गरजेची असून पनवेलकरांच्या साथीने तालुक्यात उसर्ली येथील शाळेत दुसरे बाल साहित्य संमेलन घेण्याचा आपला विचार असल्याचे चित्रलेखा जाधव यांनी सांगितले.

साहित्य संमेलन म्हणजे अध्यक्षांच्या  निवडणुकीपासून कोणाला उद्घाटनाला बोलवायचे यावरून होणारे वादविवाद, संमेलनातील अध्यक्षांचे वादग्रस्त भाषण, संमेलन संपल्यावरही सुरू रहाणारे वाद यामुळेच गाजणारी साहित्य संमेलने आपल्याला माहीत आहेत, पण रायगड जिल्ह्यात आमटेम येथे जानेवारी 2019मध्ये झालेल्या साहित्य संमेलनात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, मात्र यापैकी काहीच झाले नाही. मोठ्यांचा आदर्श न घेता झालेले हे जिल्ह्यातील पहिलेच बाल साहित्यिकांचे संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. त्याची दखल सर फाऊंडेशनने घेऊन राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2019मध्ये संमेलन घेणार्‍या चित्रलेखा जाधव यांचा गौरव केला. 

रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील रायगड कन्या व शिक्षकवृंद,  रायगड या शिक्षकांच्या ग्रुपमधील सक्रिय शिक्षकांनी आज मुलांच्यात  वाढत असलेली टीव्ही आणि  मोबाइल गेमची वाढती आवड व त्यामुळे होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी साहित्य वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांनी लिहिते व्हावे यासाठी नवोपक्रम म्हणून बाल साहित्य संमेलन घेण्याचे ठरवले. त्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील मुलांमधूनच बालसाहित्य संमेलनाचे अध्यक्ष केतन मोकल स्वागताध्यक्ष तसेच मनस्वी म्हात्रे यांची  निवड करण्यात आली. संमेलनाचे उद्घाटन पेण पंचायत समितीच्या सभापती स्मिता पेणकर यांनी  केले. संमेलनाला पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे, जिल्ह्यातील शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक अशा 750 साहित्यप्रेमींनी संमेलनाला भेट दिली.

मराठी साहित्य संमेलनाच्या  सुरुवातीला ज्याप्रमाणे साहित्य दिंडी काढली जाते,  त्याप्रमाणे 7 जानेवारी रोजी पेण तालुक्यातील आमटेम येथे साहित्य दिंडी काढण्यात आली. तिला चांगला प्रतिसाद मिळाला. संमेलनाला सुरुवात झाल्यावर कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन बाल साहित्यिकांनीच केले. अध्यक्षांनी आपल्या भाषणात आपल्याला लेखनाची आवड असल्याने पहिल्या बाल साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद  मिळाल्याचा आनंद व्यक्त करून आपल्या कविता सादर केल्या. पहिल्या सत्रात बाल साहित्यिकांनी कथाकथन, अभंग, कविता, नाट्य यांचे सादरीकरण आणि मराठी भारूड, पोवाडा सादर केले. त्यांना साहित्यिकांशीही सुसंवाद साधण्याची संधी मिळाली. दुसर्‍या सत्रात बाल साहित्यिक चंद्रकांत म्हात्रे आणि साहित्यिक लक्ष्मण पाटील यांनी या बाल साहित्यिकांना आपले निरीक्षण कसे असावे आणि लिहिताना कसे लिहावे याबद्दल कानमंत्र दिला. यामुळे बालगोपाळांच्या प्रतिभेला आणि अभिव्यक्तीला संधी मिळाल्याचे दिसून येत आहे. साहित्य आणि वाचन

संस्कृती वाढवण्यासाठी वाचनाची आवड निर्माण होऊन साहित्याची गोडी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

-नितीन देशमुख

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply