Breaking News

एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; दोघे जण जखमी

पनवेल : बातमीदार

नेरूळ येथून पामबीचमार्गे पनवेल येथे जाणार्‍या तरुणांच्या मोटरसायकलला उरणच्या दिशेने जाणार्‍या भरधाव एसटी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकल चालविणारा तरुण ठार, तर अन्य दोघे जबर जखमी झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री किल्ला जंक्शन येथे घडली. या अपघातातील दोघा जखमी तरुणांवर अपोलो रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातप्रकरणी सीबीडी पोलिसांनी एसटी बसचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अपघातातील मृत तरुणाचे नाव सुरज चव्हाण असे असून, जखमींमध्ये संदीप झावरे व कपिल वाघमारे या दोघांचा समावेश आहे. हे तिघेही पनवेलमध्ये रहाण्यास आहेत. रविवारी रात्री सुरज चव्हाण याने बुलेट मोटरसायकल आणली होती. त्यामुळे सुरज, संदीप आणि कपिल हे तिघे रात्री 10च्या सुमारास बुलेटवरून पनवेलहून नेरूळ येथे आले होते. त्यानंतर रात्री साडेबाराच्या सुमारास ते त्याच बुलेटवरून पनवेल येथे जाण्यासाठी पामबीचमार्गे निघाले होते. या तिघांची बुलेट किल्ला जंक्शनमध्ये आली असता उरण फाट्यावर उरणच्या दिशेने जाणार्‍या भरधाव एसटी बसची त्यांच्या बुलेटला धडक बसली. अपघातात तिघे जबर जखमी झाल्याने त्यांना तत्काळ जवळच्या अपोलो रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत सुरज चव्हाणचा मृत्यू झाला, तर संदीप आणि कपिल हे दोघे जखमी झाले. या अपघातप्रकरणी सीबीडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply