Breaking News

दाखणे पूल बनलाय धोकादायक

माणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील अनेक गावांना जोडणार्‍या दाखणे गावाजवळील पुलाची पडझड सुरू असून, तो कधीही कोसळण्याच्या स्थितीत  आहे. या पुलावरून विद्यार्थी व ग्रामस्थांची ये-जा असते, मात्र हा पूल धोकादायक स्थितीत असल्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हा पूल तत्काळ नव्याने बांधण्यात यावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत.

माणगाव तालुक्यातील दाखणे, कालवण, मुंढेवाडी तसेच अनेक आदिवासी वाड्यांतील ग्रामस्थांना बाजार व अन्य कामासाठी माणगाव किंवा इंदापूरकडे येण्या-जाण्यासाठी दाखणे गावाजवळील पुलाचा वापर करावा लागतो. शाळा, महाविद्यालयात जाणार्‍या विद्यार्थ्यांचीही या पुलावर सतत वर्दळ असते. त्यामुळे हा पूल महत्त्वाचा झाला आहे. हा दाखणे पूल अनेक वर्षांपूर्वी बांधला होता. गेल्या काही वर्षांत त्याची डागडुजीही करण्यात आली नाही. त्यामुळे या पुलाची पडझड सुरूच आहे. पुलाचे पूर्ण सिमेंट प्लास्टर गळून पडले आहे. त्यातून लोखंडी सळया दिसू लागल्या आहेत. तसेच पावसाळ्यात या पुलावरून पाणी वाहते. पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून, त्या खड्ड्यात एखादे वाहन अडकून पुलाखाली पडेल किंवा पूल कोसळून जीवितहानी होण्याची भीती ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे.

या पुलासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने तीन वर्षांपूर्वी एक कोटी 40 लाख रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून तसा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला होता. दाखणे, कालवण, मुंढेवाडी तसेच आदिवासी आणि बौध्दवाड्यांतील ग्रामस्थांनीही या पुलाच्या नूतनीकरणाची मागणी लावून धरली होती, मात्र या मागणीचे पुढे काहीच झाल्याचे दिसत नाही.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply