Breaking News

उरणमध्ये डेंग्यूची साथ

रुग्णांची धावाधाव; आरोग्य यंत्रणा सतर्क

उरण : प्रतिनिधी

पावसाळा सरून हिवाळ्याची चाहूल लागताच उरण तालुक्यात डेंग्यूच्या मच्छरांनी उच्छाद मांडला आहे. तालुक्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याने अनेकांनी शासकीय रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांत धाव घेतली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तुंबलेले पाणी व दमट वातावरणामुळे उरण तालुक्यात डासांची पैदास झाली असून, डेंग्यू तापाची लागण झाली आहे. परिणामी तालुक्यातील अनेक लोक डेंग्यूच्या तापाने फणफणले आहेत. 15 दिवसांपूर्वी चिरनेर गावातील अर्जुन फोफेरकर या व्यक्तीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक भयभीत झाले असून, त्यांनी खासगी आणि शासकीय रुग्णालयांत उपचारासाठी आश्रय घेतला आहे. आरोग्य विभाग या सर्व गंभीर परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.

आम्ही गावोगावी कंटेनर सर्वेक्षण केल्यानंतर त्यात काही अळ्या आढळल्या. त्या तपासणीसाठी घेऊन जातो. लोकांनी पाणीसाठा आठ दिवसांपेक्षा जास्त ठेवू नये, अन्यथा त्यात डेंग्यूच्या अळ्या तयार होतात. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी आणि आरोग्य विभागाला सहकार्य करावे.

-शरद घाडगे, आरोग्य सहाय्यक, उरण

आम्ही पंचायत समितीमार्फत प्रत्येक ग्रामपंचायतीला सूचना दिल्या आहेत. त्या-त्या ग्रामपंचायतींनी फवारणी करणे गरजेचे आहे.

-के. बी. अंजने, सहाय्यक गटविकास अधिकारी, पंचायत समिती, उरण

शहर हद्दीत नगर परिषदेच्या आरोग्य यंत्रणेमार्फत डास, मच्छरांचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी फवारणी सुरू असून, शहरातील कचर्‍याच्या ठिकाणी केमिकल्सयुक्त पावडरही टाकण्यात येत आहे.

-अवधूत तावडे, मुख्याधिकारी, उरण नगर परिषद

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply