अमित शहा यांची घोषणा
रांची : वृत्तसंस्था
झारखंडमधील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्वतः धुरा हाती घेतली आहे. झारखंडच्या लातेहारमध्ये बोलताना अमित शहा यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसने अयोध्या प्रकरणात आडकाठी करण्याचा प्रयत्न केला. अयोध्येवर आता सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आणि अयोध्येत आता गगनाला भिडणारे राम मंदिर बांधू, अशी घोषणा अमित शहा यांनी या वेळी केली. अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 काढल्याचाही उल्लेख प्रचारसभेत केला. काँग्रेसने व्होट बँकेच्या नादात देशाला 70 वर्षे अडकून ठेवले, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 हा कलंक हटवून काश्मीरच्या विकासाचा मार्ग मोकळा केला. स्पष्ट बहुमताचे सरकार येताच पहिल्याच अधिवेशनात ऐतिहासिक निर्णय मोदींच्या सरकारने घेतला, असे ते म्हणाले. दरम्यान, या वेळी अमित शहा यांनी आदिवासी मतदारांनाही साद घातली. केंद्र सरकारने आदिवासींसाठी सुरू केलेल्या अनेक योजनांची माहिती त्यांनी दिली. भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत आदिवासींचा सन्मान वाढवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. सरकारने डिस्ट्रिक्ट मिनरल फंड अंतर्गत आदिवासींसाठी 32 हजार कोटी रुपये दिले, असे त्यांनी स्पष्ट केले. अयोध्येत राम मंदिर व्हावे असे प्रत्येकाला वाटत होते, पण काँग्रेसने खटलाच चालू दिला नाही. आम्हालाही वाटायचे की घटनात्मक पद्धतीने हा वाद सुटला जावा, पण एवढ्या वर्षांपासून खटलाच चालत नव्हता. श्रीरामाच्या कृपेने आता सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला आहे आणि त्याच जागेवर भव्य राम मंदिराचा मार्गही मोकळा झाला, असे अमित शहा यांनी सांगितले. केंद्रातील यापूर्वीच्या यूपीए सरकारवरही अमित शहांनी हल्लाबोल केला. सोनिया-मनमोहन सिंह यांच्या सरकारने 13व्या वित्त आयोगात झारखंडच्या विकासासाठी 55 हजार 253 कोटी रुपये दिले, पण मोदी सरकारने झारखंडसाठी तीन लाख आठ हजार 487 कोटी रुपयांचा निधी दिला, असा दावाही अमित शहा यांनी केला.