अलिबाग : जिमाका
राज्य शासनाच्या हरित महाराष्ट्र चळवळीतंर्गत या वर्षी 33 कोटी वृक्ष लागवड अभियानासाठी रायगड जिल्ह्यात रोपांची लागवड करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाने संपूर्ण जिल्ह्यात 30 ठिकाणी रोपवाटिका तयार करून 45 लाख 78 हजार रोपांची निर्मिती केली आहे, अशी माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी ए. एस. निकत यांनी दिली.
यंदाच्या लागवड मोहिमेसाठी सामाजिक वनीकरण विभागाला जिल्ह्यात 16 लाख रोप लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील रस्ते, कालवे, समुद्रकिनारे, गायराने, पडीक जमिनी अशा ठिकाणी वृक्ष लागवडीचे नियोजन विभागामार्फत करण्यात आले आहे. आतापर्यंत 13 लाख 60 हजार खड्डे खोदून पूर्ण झाले आहेत. हे अभियान 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सामाजिक वनीकरण विभाग या अभियानात जिल्ह्यातील 805 ग्रामपंचातींना प्रत्येकी 3200 याप्रमाणे रोपे मोफत उपलब्ध करून देणार आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात संपूर्ण ग्रामपंचायत क्षेत्रात 25 लाख 76 हजार इतकी रोपे सामाजिक वनीकरण विभाग उपलब्ध करून देणार आहे.