नागोठणे : प्रतिनिधी
बांधकाम चालू करण्यापूर्वी ’महारेरा’कडे नोंदणी केली नसल्याचा ठपका ठेवत येथील एका नागरिकाने केलेल्या तक्रारीची संबंधित विभागाने तातडीने दखल घेतली असून, उद्या शुक्रवारी (दि. 22) मुंबईत सुनावणी घेण्यात येणार आहे. एखाद्या बिल्डरचे विरोधात नागोठण्यातून महारेराकडे पहिल्यांदाच अशी तक्रार झाली असल्याने निर्णय कसा असेल, याकडे येथील जनतेचे लक्ष केंद्रित झाले आहे.
नागोठणे येथील बिल्डर फरहान निसारअली चौधरी यांनी सर्वे नं. 79, प्लॉट नं. 5 मधील 2506 चौरस मीटर पैकी 1253 चौरस मीटर जागा साठेकराराद्वारे खरेदी करून 22 हजार चौरस फूट जागेत 27 सदनिका बांधण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. राज्यात 1 मे 2017 रोजी महारेरा कायदा लागू करण्यात आला आहे. मोठे बांधकाम करावयाचे असल्यास संबंधित बिल्डरने बांधकाम चालू करण्यापुर्वी ’महारेरा ’ त नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. चौधरी यांनी चालू केलेल्या अंबा रेसिडेन्सीची महारेरात नोंदणी केलेली नाही, असा ठपका ठेवत येथील सुधीर यशोधरन कुन्नुथरा यांनी काही दिवसांपूर्वी महारेराकडे तक्रार नोंदवली होती व या तक्रारीची महारेराकडून तातडीने दखल घेतली असून, त्याची सुनावणी वांद्रे, मुंबईतील महारेराच्या कार्यालयात शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.