Breaking News

ही तर संधीसाधू आघाडी!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची आघाडी जवळपास निश्चित झाली आहे आणि सत्तेची तयारीही सुरू झाल्याचे सांगितले जातेय, मात्र महाराष्ट्रात आता होऊ घातलेली महाविकास आघाडी ही संधीसाधू राजकारणाचे उदाहरण असल्याची टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. जी आघाडी झाली आहे ती सिद्धातांच्या आधारांवर झालेली आघाडी नाही. त्यामुळे हे सरकार स्थापन झाले तरीही फार काळ टिकणार नाही, असे भाकितही गडकरींनी वर्तविले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी हे वक्तव्य केले.

या पक्षांमध्ये (काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना) वैचारिक ताळमेळ नाही. शिवसेनेच्या विचारधारेला काँग्रेसने कायमच कडाडून विरोध केला आहे, तर काँग्रेसच्या विचारधारेला शिवसेनेने विरोध केला आहे, हे आपण जाणतोच. राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची विचारधाराही शिवसेनेपेक्षा वेगळी आहे. विचारांच्या आणि सिद्धांतांच्या आधारे ही महाविकास आघाडी झालेली नाही. ही फक्त संधीसाधू आघाडी आहे. त्यामुळेच ही महाविकास आघाडी टिकणार नाही आणि महाराष्ट्रात स्थिर सरकारही देऊ शकणार नाही. महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण होईल. हे जनतेसाठी चांगले नाही, असे गडकरी म्हणाले. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अस्थिर सरकार राहणे हा गुंतवणुकीच्या दृष्टीने चिंतेचा मुद्दा मानला जातो, याकडेही गडकरींनी लक्ष्य वेधले.

भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांची युती ही सिद्धांताच्या आणि विचारांच्या आधारावर झालेली होती. हिंदुत्त्वाचा विचार त्यामागे होता. त्यामुळे दीर्घकाळ चाललेली युती म्हणूनच भाजप-शिवसेना युतीकडे पाहिले गेले आहे. आजही आमच्या विचारांमध्ये मतभिन्नता नाही. युती तुटली आहे, हे मराठी माणसाचे नुकसान आहे, असेही गडकरींनी नमूद केले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply