सिडकोकडून निविदा जाहीर

पनवेल ः बातमीदार
तळोजा एमआयडीसीत जाणार्या पर्यायी रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून खड्डे पडलेल्या या रस्त्यातून येत्या काळात मुक्तता होईल, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. सिडकोकडून या काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. सिडकोने यासाठी 17 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरून निविदा मागविल्या आहेत. अनेक वर्षांपासून पनवेल-मुंब्रा रस्त्यावरून तळोजा एमआयडीसीत जाण्यासाठी नावडे येथून एक रस्ता आहे. या रस्त्यावरून अवजड वाहनांची सततची ये-जा असल्याने वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. यावर तोडगा म्हणून एमआयडीसीत जाण्यासाठी काही वर्षांपूर्वी पर्यायी उड्डाणपूल बनविण्यात आला. हा पूल फूडलँड कंपनीजवळून तळोजा एमआयडीसीत सीईटीपीपर्यंत जाऊन थेट दुसर्या मार्गाने एमआयडीसीत प्रवेश करता येतो. या नव्या मार्गामुळे वाहतूक कोंडीचा भार काही प्रमाणात कमी झाला होता, मात्र या डांबरी मार्गावर वारंवार खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली होती. दीड किलोमीटरच्या मार्गावर पावसाळ्यापूर्वीपासून मोठ्या प्रमाणात खड्डे पडून वाहने चालविणे कठीण झाले आहे. पावसाळा संपल्यानंतर येथील खड्ड्यांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तळोजा इंडस्ट्रीयल असोसिएशनने या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याची मागणी केली होती. कळंबोली वसाहतीमधून तळोजात जाणारा हा मार्ग सोयीचा असल्यामुळे अनेक कामगार या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे खराब रस्त्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. सिडकोने अखेर नागरिकांच्या मागणीचा विचार करून दीड किलोमीटरच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोने रस्ता तयार करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. रस्त्यासाठी 16 कोटी 11 लाख, 93 हजार 924 रुपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे. त्यामुळे दररोज शेकडोच्या संख्येने अवजड वाहनांची वर्दळ असलेल्या रस्ता काँक्रिटचा असावा, अशी येथील उद्योजकांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. अखेर सिडकोने काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे.
सर्वांच्या सोयीचा हा रस्ता डांबराचा असल्यामुळे वारंवार खड्डे पडत होते. दुचाकीस्वार कामगारांना या रस्त्यावरून जाणे जीवघेणे झाले होते. आम्ही सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची मागणी केली होती. सिडकोने निविदा प्रसिद्ध केल्यामुळे अल्पावधीतच या रस्ता काँक्रिटीकरण होऊन शेकडो उद्योजकांची, नागरिकांची आणि अवजड वाहनचालकांची गैरसोय दूर होईल.
-सतीश शेट्टी, अध्यक्ष, तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन