नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इस्राईलममध्ये पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भारतातील निवडणुकांप्रमाणे इस्राईलमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा पाहायला मिळत आहे. या निवडणुकीतील खास आकर्षण म्हणजे नेतन्याहू प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या फोटोंचा वापर करत आहेत.
नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांचा फोटो वापरून परराष्ट्र धोरणाचं यश दाखवण्याचा प्रयत्न नेतन्याहू करत आहेत. नेतन्याहू यांनी जगभरातील नेत्यांना भेटल्याचा व्हिडीओही जारी केला आहे. या व्हिडीओत नेतन्याहू नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांना भेटत आहेत. वेगवेगळ्या कार्यक्रमांमधील हा व्हिडीओ आहे. पंतप्रधान नेतन्याहू यांच्या पक्षाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नेतन्याहू नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत दिसत आहेत.
इस्राईलमध्ये या वर्षी एप्रिल महिन्यात निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत नेतन्याहू यांच्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळू शकलं नाही आणि इतर पक्षाशी त्यांची युतीही झाली नाही. त्यामुळे इस्राईलमध्ये सप्टेंबर महिन्यात पुन्हा निवडणूक होत आहे.