नागोठणे : प्रतिनिधी
पुलवामा येथे भारतीय जवानांवर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष तसेच व्यापारी संघटना, रिक्षा तसेच इतर सामाजिक संघटनांनी पुकारलेल्या नागोठणे बंदला मंगळवारी (19 फेब्रुवारी) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी शहरातील मुख्य बाजारपेठ, खुमाच्या नाक्यावरील दुकाने तसेच हॉटेल, सलून, टपर्या, तीन व सहा आसनी रिक्षा बंद ठेवून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मंगळवारी सकाळी दहा वाजता भाजपचे प्रकाश मोरे, आनंद लाड, किशोर म्हात्रे, मोरेश्वर म्हात्रे, नारायण म्हात्रे, विवेक रावकर, शेखर गोळे, सुरेश जैन, हिरामण तांबोळी, रऊफ कडवेकर, उदंड रावकर, ग्रा.पं.सदस्य अतुल काळे, व्यापारी संघटनेचे शब्बीर नागोठणावाला, अनिल काळे, बाळासाहेब टके, विनायक गोळे, सुधाकर जवके, शब्बीर पानसरे आदींसह शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत शिवाजी चौकात निषेध सभा घेण्यात आली. या सभेत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अनेक वक्त्यांनी पाकिस्तानचा धिक्कार करताना केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. या सभेनंतर शेकडो नागरिकांनी काढलेली रॅली संपूर्ण शहरात फिरविण्यात आली.