नगर : प्रतिनिधी
ओल्या दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकर्याला मदतीची अपेक्षा ही भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडूनच होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार मिळणार असल्यामुळे शेतकर्यांना भरघोस मदतीची असलेली अपेक्षा पूर्ण होईल, असा विश्वास माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केला. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याचा 70वा गळीत हंगाम शुभारंभ आणि बॉयलर अग्निप्रदीपन सभारंभ आमदार राधाकृष्ण विखे-पाटील आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या उपस्थितीत झाला. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास कारखान्याचे अध्यक्ष खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, उपाध्यक्ष कैलास तांबे, ट्रक सोसायटीचे अध्यक्ष जग्गनाथ राठी, प्रवरा बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब भवर, उपाध्यक्ष अशोक असावा, डॉ. भास्करराव खर्डे, प्रवरा फळे भाजीपाला सोसायटीच्या अध्यक्ष गीता थेटे, कारखाना कामगार सभेचे सरचिटणीस अविनाश आपटे उपस्थित होते. विखे-पाटील म्हणाले की, या वर्षी उसाची टंचाई मोठ्या प्रमाणात असल्याने बहुतांशी कारखाने बंद राहणार आहेत. उसाअभावी गणेश आणि राहुरी कारखाना बंद ठेवावा लागतो, याचे दु:ख आहे.आगामी काळात मात्र पाण्याची उपलब्धता मोठ्या स्वरूपात असल्यामुळे 100 टक्के उसाची लागवड शेतकर्यांनी करावी जैविक तंत्रज्ञानाचा उपयोग करून उसावरील कीड नियंत्रण सुधारण्याचा प्रयत्न करावा लागेल. यासाठी लखनौ येथील ऊस संशोधन केंद्राशी कारखान्याचा करार झाला आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.