मुंबई : प्रतिनिधी
देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर सुनावणी सुरू होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय खासदार संजय काकडे यांनी ‘सिल्व्हर ओक’ला येत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. काकडे यांच्या पवार भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना वेग आला आहे, मात्र आपली ही खासगी भेट असून, या भेटीत कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झाली नसल्याचे काकडे यांनी स्पष्ट केले. काकडे यांच्या भेटीदरम्यान राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षाचे गटनेते जयंत पाटील हेही उपस्थित होते. दरम्यान, संजय काकडे आणि अजित पवार यांची मैत्री सर्वांनाच माहीत असून काकडे यांनी दोन पवारांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी शरद पवार यांची भेट घेतली असावी, अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. एकीकडे खासदार संजय काकडे यांनी शरद पवार यांची भेट घेतली असताना दिलीप वळसे- पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर बंडखोरी केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. वळसे-पाटील हे शरद पवार यांचा काही निरोप घेऊन अजित पवारांकडे गेले का, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काकडे आणि वळसे-पाटील यांच्या भेटीमागे समान धागा आहे का, या दृष्टीनेही या भेटींकडे पाहिले जात आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले, …हा तर सुखद धक्का!
मुंबई : प्रतिनिधी
अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढलेले भाजप नेते गोपीचंद पडळकर अचंबित झाले. पडळकर म्हणाले की, अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना पाहिल्यावर धक्का बसला, पण तो सुखद धक्का होता. राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघा महाराष्ट्र आश्चर्यचकीत झाला. यामध्ये एक व्यक्ती तथा नेते असेही आहेत ज्यांनी भाजपकडून अजित पवारांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. ते म्हणजे गोपीचंद पडळकर. एका वृत्तवाहिनीशी बोलताना पडळकर म्हणाले की, अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना पाहिल्यावर धक्का बसला, पण तो सुखद धक्का होता. जे झाले ते महाराष्ट्राच्या हिताचे आहे. अजित पवारांचा भाजपमध्ये येण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. निवडणूक लढताना असे काही होईल याचा अजिबात अंदाज नव्हता, तसेच शिवसेना ही राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊ शकेल हेही कधी वाटले नव्हते, असेदेखील पडळकर म्हणाले. राजकारणात काहीही घडू शकते हे यावरून सिद्ध झाले आहे. मी प्रवासात असताना घाटात होतो. त्या वेळी फोन आला की शपथविधी सुरू आहे. तेव्हा फोनवर शपथविधी पहिला, असे त्यांनी सांगितले. बारामतीतल्या मतदारांचा विश्वासघात नाही तर त्यांना स्थिर सरकार देण्यासाठीच अजित पवारांनी असा निर्णय घेतला असेल, असेही पडळकर म्हणाले. अजित पवारांनी सहज नाही, तर सर्व विचारांती हा निर्णय घेतला असणार. आज लोकांच्या भावना स्फोटक असतील, पण हळूहळू कमी होतील, असेही पडळकर यांनी म्हटले.
‘शिवसेनेने काँग्रेससोबत जाण्याचे महापाप केले’
औरंगाबाद : प्रतिनिधी
शिवसेनेने काँग्रेससोबत जाण्याचे महापाप केले. शिवसेना राष्ट्रवादी, काँग्रेससोबत गेली ते बरोबर असते, पण राष्ट्रवादीचे काही आमदार भाजपसोबत गेले तर ते चुकीचे अशी दुहेरी भूमिका योग्य नाही, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शिवसेनेला फटकारले आहे. नरेंद्र मोदी आणि महायुतीच्या नावे मते मागितली. महाराष्ट्रातील मतदारांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत, हा कौल दिला होता, असे सांगून जावडेकर यांनी पुन्हा मुख्यमंत्री झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.