Breaking News

नलक्षवाद्यांकडून वाहनांची जाळपोळ

दंतेवाडा : छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांनी एक डम्पर आणि जेसीबीसह नऊ वाहने पेटवून दिली. या अगोदर झारखंडमध्ये लातेहार जिल्ह्यात नक्षलींनी केलेल्या हल्ल्यात चार पोलिसांचा मृत्यू झाला होता. तत्पूर्वी 13 नोव्हेंबर रोजी छत्तीसगड येथील सुकमामधील गचनपल्ली गावात डीआरजी (डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह फोर्स)कडून करण्यात आलेल्या कारवाईत एक लाखाचा इनाम असलेल्या नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक झालेल्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठादेखील जप्त करण्यात आला होता.

गोवारीकरांना जम्बो सुरक्षा

मुंबई : ऐतिहासिक चित्रपट आणि वादविवाद हे समीकरण जणू ठरलेलेच आहे. पानिपत : द ग्रेट बेट्रेयल या चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. विविध संघटनांकडून या धमक्या मिळत असून, गोवारीकरांच्या सुरक्षेसाठी 200 पोलिसांची फौज तैनात करण्यात आल्याची माहिती आहे. ऐतिहासिक घटनांची छेडछाड करून चित्रपटात दाखवल्याचा आरोप या संघटनांनी गोवारीकर यांच्यावर केला आहे. त्याचसोबत या चित्रपटातील काही दृश्यांवर त्यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे एका वृत्तानुसार, खबरदारीचा उपाय म्हणून गोवारीकर यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

हस्तिदंत विकणारे अटकेत

पुणे ः शहरात हस्तिदंताची विक्री करण्यासाठी आलेल्या मुंबई येथील दोघांना विमानतळ पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून 45 लाख रुपये किमतीचे दोन हस्तिदंत, मोटार असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याहिया अहमद खान (42, रा. वाशी, मुंबई) आणि अभय अरविंद जोशी (25, रा. नेरूळ पश्चिम, नवी मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे दोघे नवी मुंबई परिसरात इस्टेट एजंट म्हणून काम करतात. एक हस्तिदंत साधारणतः सात किलोपेक्षा अधिक वजनाचा आहे. त्यांच्याकडून दोन हस्तिदंत, पैसे मोजण्याचे मशिन, मोटार आणि मोबाइल असा एकूण 45 लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक गजानन पवार यांनी दिली. विमानतळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक ए. डी. पिंगळे यांना विमानतळ परिसरातील साकोरेनगर रस्त्यावर काही जण हस्तिदंताची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply