कोलकाता : वृत्तसंस्था
ऐतिहासिक डे-नाइट कसोटी सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा एक डाव आणि 46 धावांनी दारुण पराभव केला. या विजयानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरभ गांगुलीचे भरभरून कौतुक केले, पण विराटच्या या कृतीवर लिटल मास्टर म्हणून ओळख असणार्या सुनील गावसकरांनी मात्र सणसणीत प्रत्युत्तर दिले.
सामन्यानंतर बोलताना कोहली म्हणाला, वन डे आणि टी-20प्रमाणेच टेस्ट क्रिकेट मार्केटही फार महत्त्वाचे आहे, तसेच पुढे बोलताना त्याने सांगितले की, सौरव गांगुली कर्णधार असतानाही भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी केली होती. खरंतर दादाच्या संघाने याची सुरुवात केली आणि त्यांनी सुरू केलेली ही विजयी परंपरा आम्ही पुढे घेऊन जात आहोत.
दरम्यान, कोहलीच्या या गोष्टीवर माजी क्रिकेटर सुनील गावसकर म्हणाले की, असे अजिबात नाही. टीम तेव्हाही जिंकत होती, जेव्हा कोहलीचा जन्मही झाला नव्हता. सामना संपल्यानंतर गावसकर म्हणाले की, हा खरंच ऐतिहासिक विजय आहे. भारतीय संघाचा कर्णधार म्हणाला की, या गोष्टीला 2000मध्ये सुरुवात झाली होती, जेव्हा गांगुली कर्णधार होते. मला माहितेय की सध्या दादा बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे कदाचित कोहली त्यांच्याबाबत एवढे चांगले बोलत असेल, परंतु भारत 1970 आणि 1980मध्ये जिंकत होता, जेव्हा कोहलीचा जन्मही
झाला नव्हता.
पुढे बोलताना गावसकर यांनी अनेक लोकांचा आजही असाच गैरसमज आहे की क्रिकेटची सुरुवात 2000 साली झाली, पण भारतीय संघाने परदेशात 1970
आणि 1986च्या दशकात मालिका जिंकली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.