Breaking News

आता मोबाइलवरूनही भरता येणार पनवेल महापालिकेचा मालमत्ता कर

पीएमसी टॅक्स अ‍ॅपचे उद्घाटन

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका करदात्यांना आता घर बसल्या आपल्या महापालिका करांचा भरणा करता येणार आहे. त्याचप्रमाणो नावातील फेरफार किंवा तक्रारीबाबत आक्षेप, मालमत्ता उतारा व थकबाकीदार नसल्याचा दाखला महापालिका कार्यालयात न जाता मोबाइलवरून भरता येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या नवीन अ‍ॅपचे उद्घाटन पालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 22) करण्यात आले. 1 एप्रिलपासून महापालिकेचा कर विभाग पेपरलेस होणार आहे.
महापालिका आपल्या दारी या उपक्रमामध्ये ई-गव्हर्नन्सच्या दृष्टीने पनवेल महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलून मंगळवारी पीएमसी टॅक्स अ‍ॅपचे उद्घाटन पालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. सोबत उपायुक्त विठ्ठल डाके, गणेश शेट्ये, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, मालमत्ता कर विभागाचे प्रमुख सुनील मानकामे उपस्थित होते.
या वेळी आयुक्त गणेश देशमुख म्हणाले की, सगळ्यात कमी कर असलेली आपली महापालिका आहे. पाच वर्षांत आपण कर ठरवला नाही तर महापालिकेचा कारभार कसा चालेल. विकासकामे होणार नाहीत. खरे तर पहिल्या दोन वर्षांतच कर लावणे गरजेचे होते. प्रत्येकाला कर हा भरावाच लागेल. या अ‍ॅपमुळे जास्तीत जास्त नागरिक कर भरतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या वेळी मालमत्ता कर विभागातील कर्मचार्‍यांना टॅब व प्रिंटरचे वाटप आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले.
पनवेल महापालिका हद्दीतील नागरिकांना आपल्या मालमत्तेच्या कर आकारणी व त्यासंबंधी कागदपत्रांसाठी पालिकेत फेर्‍या मारायला लागू नयेत व त्यांचा वेळ वाचवा यासाठी महापौर डॉ. कविता चौतमोल व आयुक्त गणेश देशमुख यांच्या पुढाकाराने हे अ‍ॅप बनविण्यात आले आहे. स्थापत्य या कंपनीने ते बनवले आहे. गुगल अ‍ॅप स्टोअरमधून ते मालमत्ताधारकांना आपल्या मोबाइलमध्ये घेता येणार आहे. या अ‍ॅपमधून महापालिका स्थापन झाल्यापासूनच्या कराच्या पावत्या डाऊनलोडही करता येणार आहेत. त्यामुळे मालमत्ताधारकांना आपल्या करासंबंधी सगळ्या बाबी घरी बसून उपलब्ध होणार आहेत.
या अ‍ॅपच्या माध्यमातून मालमत्ताधारकांना एसएमएसद्वारे मालमत्ता कराची बिले तसेच अंतिम तारखेचे नोटिफिकेशनदेखील येणार आहे. हे अ‍ॅप मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत उपलब्ध करून देण्यात आले आहे. पीएमसी टॅक्स अ‍ॅप डाऊनलोड करताना सुरुवातीस साइन अप करावे लागेल, ज्यामध्ये मालमत्ताधारकाचा मोबाइल नंबर व एक पासवर्ड देण्यात येईल. तो प्रत्येक वेळी त्यास साईन इन करताना द्यावा लागेल. पुढे अ‍ॅपमध्ये मालमत्ताधारकांना त्यांचा मालमत्ता कर दिसेल तसेच नागरिकांची मालमत्ता, त्यांची पेमेंट पासबुक , नोंदणीकृत मालमत्ता कळू शकणार आहे. अ‍ॅपमध्ये पुढे ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरण्यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय, भीम यूपीआय, क्युआर कोड असे विविध पर्याय दिसू शकतील. त्याचप्रमाणे ज्यांना ई-बिल हवे आहे त्यांना ही सेवा देण्याची सोयही या अ‍ॅपमध्ये करण्यात आली आहे.

आयुक्त गणेश देशमुख यांनी आल्यावर कर आकारणी केली. इतर महापालिकांशी तुलना केल्यास ती कमी आहे. पनवेल महापालिकेचे पहिले आयुक्त सुधाकर शिंदे यांनी महापालिका स्थापन झाल्यावर त्यांच्या कालावधीत मालमत्ता कराची आकारणी केली नाही. त्यामुळे नागरिकांना पाच वर्षांची एकदम रक्कम भरावी लागत आहे. ती मोठी आहे. कोरोनामुळे अनेकांची नोकरी गेली किंवा पगार कमी झाले. त्यामुळे त्यांना ही रक्कम भरणे अवघड वाटते हे खरे आहे, पण या सगळ्याला पहिले आयुक्त सुधाकर शिंदेच जबाबदार आहेत.
-डॉ. कविता चौतमोल, महापौर

पनवेल महापालिकेत वर्षाला 210 कोटी कर जमा होणे अपेक्षित आहे. आजपर्यंत कोणतीही सक्ती न करता 80 कोटी कर जमा झाला आहे. 31 मार्चपर्यंत आणखी 50 कोटी कर जमा होण्याची अपेक्षा आहे. 1 एप्रिलपासून मात्र दंड आकारण्यात येऊन जप्तीची कारवाई सुरू करणार असल्याने जास्तीत जास्त मालमताधारकांनी कर भरावा
-गणेश देशमुख, आयुक्त

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply