Breaking News

…अन्यथा आरपारची लढाई

विजयी मेळाव्यात प्रकल्पग्रस्तांचा निर्धार

नागोठणे ः प्रतिनिधी

आंदोलनाची आम्हाला अजिबात हौस नाही, मात्र जनतेच्या हक्कांसाठी आमची लोकशासन संघटना बाहेर पडली तर हक्क मिळवून दिल्याशिवाय थांबत नाही. जगात जनशक्तीला कोणीही हरवू शकले नसून रिलायन्सने प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावले नाहीत, तर पुढची लढाई आरपारची असेल, असा इशारा लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे प्रदेश संघटक राजेंद्र गायकवाड यांनी दिला आहे. येथील रिलायन्स प्रकल्पग्रस्तांचे काही प्रश्न रोह्याचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या मध्यस्थीने मार्गी लागल्याबद्दल लोकशासनच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांचा विजयी मेळावा मंगळवारी (दि. 8) सायंकाळी रिलायन्स कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील मोकळ्या जागेत पार पडला. त्या वेळी मार्गदर्शनपर भाषणात गायकवाड बोलत होते.

संघटनेचे स्थानिक अध्यक्ष शशांक हिरे, सरचिटणीस गंगाराम मिणमिणे यांसह सुरेश कोकाटे, प्रबोधिनी कुथे, मोहन बडे, उषा बडे आदींसह पदाधिकारी तसेच नागोठणे ते चोळे मार्गातील विविध गावांमधील शेकडो नागरिक उपस्थित होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. रिलायन्सच्या काही अधिकार्‍यांनी सांगितल्याप्रमाणे सोमवारी आम्ही तडजोडी केल्या असल्या तरी प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रलंबित प्रश्न बाकी असून रिलायन्सने सहकार्य करावे, अशी मागणी गायकवाड यांनी आपल्या भाषणात केली.

सकारात्मक चर्चा करायला आम्ही तयार असून रिलायन्सनेसुद्धा सहकार्याची भावना ठेवावी, असे शशांक हिरे यांनी सांगितले. लॉकडाऊनच्या काळातील ठेकेदारीतील कामगारांचा 54 दिवसांचा पगार, कामगारांचे पास पुन्हा बंद करण्यात येणार नाहीत असे एकूण चार प्रश्न मार्गी लागणार आहेत, मात्र उर्वरित 601 प्रकल्पग्रस्त आणि 110 नलिकाग्रस्तांचे प्रश्न बाकीच असून हे प्रश्न मार्गी लागले नाहीत, तर आंदोलन करण्यात येईल, असे गंगाराम मिणमिणे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

या वेळी उषा बडे, विठाबाई बडे, प्रबोधिनी कुथे, गुलाब शेलार, सुरेश कोकाटे, मोहन बडे यांनीसुद्धा आपले विचार मांडले. आभार प्रदर्शन नारायण म्हात्रे यांनी केले.

Check Also

पनवेल भाजी मार्केटमध्ये इनरव्हील क्लबतर्फे कापडी पिशव्यांचे व्हेंडिंग मशीन

पनवेल ः रामप्रहर वृत्तपर्यावरण संरक्षण आणि प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ पनवेलतर्फे शहरातील कृष्णाळे …

Leave a Reply