असंख्य बोटी किनार्यावर
मुरूड : प्रतिनिधी
सध्या पडत असलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका मच्छीमारांना बसला आहे. पाऊस व ढगाळ वातावरणामुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटींनी किनारा गाठला आहे.आगरदांडा, राजपुरी, खोरा बंदरात मोठ्या संख्येने बोटी शाकारण्यात आल्या आहेत.
खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी एका बोटीला किमान 80 हजार रुपयांपर्यंत सामग्रीचा खर्च होत असतो. त्यानुसार आठ दिवसांसाठी सर्व जीवनावश्यक वस्तूंची तजवीज करून बोटी मासेमारीस जातात, मात्र राज्यात सध्या अवकाळी पावसाने थैमान घातल्याने मिळालेली मासळी घेऊन सर्व बोटी सुरक्षित किनार्याला आल्या आहेत. या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्ष बोट मालकांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, अवकाळी पावसाचा जोर खोल समुद्रात जास्त होता तसेच दाट धुक्यांमुळे समोरचे काही दिसत नव्हते. कसाबसा आम्ही किनारा गाठला आहे.
सर्व बोटींवर अल्प मासळी मिळाल्यामुळे त्यांचा खर्चसुद्धा निघालेला नाही. मासळी बाजारात मासळी आली, परंतु मासळीचे प्रमाण कमी असल्याने प्रत्यक्षात लिलाव करताना चढ्या भावाने करावा लागल्याने बाजारातसुद्धा मासळीचे दर वाढले होते. सातत्याने पडणारा अवकाळी पाऊस हा कोकणातील मच्छीमारांसाठी डोकेदुखी ठरत आहे. राज्य शासनाची कोणतीही मदत मिळत नसतानासुद्धा मच्छीमार बांधव आपल्या जीवनाचा गाडा हाकत आहेत.
शेतकरीही हवालदिल
मच्छिमारांप्रमाणेच स्थानिक शेतकर्यांनासुद्धा अवकाळी पावसाने हैराण करून सोडले आहे. या वर्षी शेतकर्यांच्या मागे अवकाळी पाऊस चांगलाच हात धुवून मागे लागला आहे. पावसाची रिपरिप सुरू झालेल्याने आंबा, वाल, कलिंगड, चवळी व इतर उत्पादक शेतकर्यांची अडचणी वाढल्या आहेत.
ऐन जानेवारी महिन्यात जलधारा बरसू लागल्याने आंबाच्या झाडावर आलेला मोहोर गळून पडत आहे. आंब्याबरोबरच चवळी व वाल पीक हातचे जाण्याची भीती येथील शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. कधी संपणार हे दृष्टचक्र याची वाट शेतकरी व मच्छीमार पहात आहेत.