तळोजा : रामप्रहर वृत्त
केणी सिटी ही भविष्यात सर्वांसाठी आदर्श ठरणार असून याकरिता भूमिपुत्रांनी एकत्रित येऊन जे पाऊल उचलले आहे ते अत्यंत महत्त्वाचे आणि दिशा देणारे आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी (दि.4) तळोजा फेज 1 येथे केणी सिटीच्या भूमिपूजनावेळी केले. या वेळी माजी नगरसेवक हरेश केणी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
पुण्याजवळील मगरपट्टा शहर अशी एक टाउनशिप आहे, जी सोयीसुविधांमुळे कोणत्याही नामांकित बिल्डरच्या टाऊनशिपला मागे टाकते. विशेष म्हणजे ही टाऊनशिप शेतकर्यांनी वसवली आहे. याच धर्तीवर पनवेल महापालिका क्षेत्रातील केणी कुटुंबीयांनी पुढाकार घेत स्थानिक शेतकरी तसेच माजी नगरसेवक हरेश केणी यांनी आपली जमीन बांधकाम व्यावसायिकांना विकसित करण्यासाठी देण्याऐवजी आपणच विकसित करण्याचा निर्णय घेतला. प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांनी नेहमीच स्थानिक शेतकर्यांना उद्योजक बनण्याचे धडे दिले. या पार्श्वभूमीवर ज्या शेतकर्यांच्या जमिनी अद्याप शिल्लक आहेत अशा शेतकर्यांसाठी केणी कुटुंबीयांनी पाऊल उचलत केणी सिटी उभारण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन आणि केणी डेव्हलपर्सच्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा हरेश केणी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवारी आयोजित करण्यात आला होता. याचा शुभारंभ मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाला.
या समारंभास भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक बबन मुकादम, संतोष भोईर, जगदिश गायकवाड, अरविंद म्हात्रे तसेच प्रल्हाद केणी, रामदास शेवाळे, बबन पाटील, काशिनाथ पाटील, दिनेश केणी, शशिकांत शेळके, माजी सभापती प्रिया मुकादम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भूमिपुत्रांना सर्व सुविधांनी परिपूर्ण अशी परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत या उद्देशाने माजी नगरसेवक हरेश केणी यांच्या संकल्पनेतून तळोजा फेज 1 येथे केणी सिटी हा गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येत असल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या, तर केणी सिटीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल त्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
Check Also
राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन
विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …