Breaking News

बेकरे परिसरात रानडुकरांचा उच्छाद

50 एकर जमिनीवरील भात पिकाचे नुकसान

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील बेकरे गावाच्या परिसरातील भात पिकांचे रानडुकरांनी मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. गावाला लागून असलेल्या जंगलातील रानडुकरे गेल्या काही दिवसांपासून गावाच्या सभोवताली मुक्तसंचार करीत असून, रात्रीच्या वेळी लोकवस्तीत पोहचत आहेत. दरम्यान, नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामे केले नाहीत, त्यामुळे येथील शेतकरी संकटात सापडला आहे.

माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या बेकरे गावाला जंगलाचा वेढा आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात या भागात मोठ्या प्रमाणात जंगली प्राणी आणि पक्षी यांचे वास्तव्य वाढल्याचे स्थानिक सांगत आहेत. गेल्या वर्षांपासून या परिसरात रानडुकरांचे वास्तव्य वाढले असून त्यांनी शेतातील भात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यास सुरुवात केली आहे. या रानडुकरांनी आतापर्यंत पुंडलिक कराळे, शरद कराळे, रामचंद्र कराळे, नंदा कराळे, तुकाराम कराळे, शंकर कराळे, पुंडलिक  कराळे, शिवराम कराळे, मोरेश्वर कराळे, अर्जुन कराळे, दत्तात्रय कराळे, मनोहर कराळे, जैतु नांदे आदी 13 शेतकर्‍यांच्या सुमारे 50 एकर शेत जमिनीवरील भाताचे पीक तुडवून टाकले आहे. त्यामुळे बहुतेक शेतकर्‍यांनी भाताचे पीक शेतात तसेच टाकून दिले आहे.

रानडुकरांनी केवळ भात पिकाचेच नुकसान केले नाही, तर  ग्रामस्थांनी शेणखईत साठवून ठेवलेले शेणखतही उधळून टाकले आहे. शेतकर्‍यांनी परसबागेत किंवा शेत जमिनीत लावलेली कंदमुळेही या रानडुकरांनी बाहेर काढून खाऊन टाकली आहेत.  त्यामुळे बेकरे गावातील शेतकरी काहीसे धास्तावले आहेत.

आम्ही कोणत्याही प्राण्यांना त्रास देत नाही, त्यामुळे आमच्या गावाच्या मागे असलेल्या जंगलात मोठ्या प्रमाणात प्राणी आणि पक्षी यांचे वास्तव्य आहे. या प्राण्यांकडून आमच्या शेतीचे नुकसान होत असून, त्यांची भरपाई मिळावी, एवढी आमची अपेक्षा आहे.

-नंदा कराळे, शेतकरी, बेकरे, ता. कर्जत

कोणत्याही प्राण्याने शेत पिकाचे नुकसान केले असेल, तर त्याची नुकसानभरपाई वन विभाग देत असते. बेकरे गावातील शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात येतील.

-संजय भालेराव, नायब तहसीलदार, कर्जत

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply