पेण : प्रतिनिधी
शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत असून, यावर उपाययोजना करण्यासाठी पेण नगर परिषदेच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस नगराध्यक्षा प्रितम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, नगरसेविका शहेनाझ मुजावर, पोलीस निरीक्षक इंद्रजित काटकर, मुख्याधिकारी अर्चना दिवे आदी मान्यवर उपस्थित होते.
पेण शहरातील प्रायव्हेट हायस्कुल रोडजवळील मैदान, अग्निशमन केंद्राच्या बाजूस व भाजीमार्केटच्या मागील बाजूस वाहनांच्या पार्किंगसाठी नगर परिषदेने तात्पुरत्या स्वरूपात सोय केली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
पेण शहराच्या विकास आराखड्यातील पार्किंगसाठी असलेले आरक्षण लवकरात लवकर विकसित करणेत येईल, असे नगराध्यक्ष प्रितम पाटील यांनी या बैठकीत सांगितले. या वेळी बेशिस्त वाहन चालकांवर व रस्त्यात बेकायदेशीर वाहने उभी करणार्यांवर दंडात्मक कारवाई करणेत येईल, असे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले. या आढावा बैठकीत वाहतूक सिग्नल बसविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.