पनवेल : बातमीदार, वार्ताहर
शेडुंग टोलनाका येथे नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी दोन कारमधून 57 हजारांचे विदेशी मद्य जप्त केले. या वेळी पाच लाख रुपयांच्या दोन कार देखील जप्त करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनमुळे पनवेलमध्ये मद्यविक्री बंद आहे. त्यामुळे नागरिक पनवेलच्या बाहेरून मद्य आपल्या वाहनांमध्ये आणत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या आदेशानुसार शेडुंग टोल नाका येथे वाहनांची कसून तपासणी केली जात आहे त्यानुसार 16 मे रोजी शेडुंग टोल नाका येथील नाकाबंदी दरम्यान हुंडाई कार आणि होंडा सिटी कारची पोलिसांनी तपासणी केली असता यामध्ये विनापरवाना 57 हजार रुपयाचे विदेशी मद्य सापडून आले. पोलिसांनी हे मद्य जप्त केले असून पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पनवेलसह नवी मुंबई परिसरात दारू विक्रीस बंदी असल्याने शासनाने पेण, कर्जत, मोहोपाडा, खालापूर, रसायनी या भागातील वाईन शॉप यांना मद्य विक्रीस परवानगी दिली आहे. त्यामुळे पनवेल परिसरातील अनेक जण पहाटेच्या वेळेस त्याठिकाणी जाऊन तेथे दारू खरेदी करून पनवेलमध्ये चढ्या भावाने विक्री करण्यासाठी आणत असतात यासाठी ते आलिशान गाडीचा वापर करतात. याची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांना मिळताच त्यांनी शेडुंग टोलनाका येथे नाकाबंदी करून अशा प्रकारची चोरटी दारूची वाहतूक करणार्यांना आलिशान गाड्यांसह ताब्यात घेतले. गेल्या चार दिवसांपासून पनवेल तालुका पोलिसांच्या धडक कारवायांमुळे बेकायदेशीररित्या चोरटी दारूची वाहतूक करून पनवेलमध्ये चढ्या भावाने विकणार्या मद्यप्रेमींचे धाबे दणाणले आहेत व त्यामुळेच पनवेल परिसरातील वाईन शॉप व बियर शॉपिला 31 मे पर्यंत लॉकडाऊनच्या काळात दुकाने उघडण्याची व विक्रीची परवानगी मिळू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे.