Breaking News

महाविकास आघाडीचा शपथविधी बेकायदेशीर : चंद्रकांत पाटील

मुंबई : प्रतिनिधी

महाविकास आघाडीचा शपथविधी हा बेकायदेशीर असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. याविरोधात राज्यपालांकडे एकाने याचिका दाखल केली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीचा शपथविधी बेकायदेशीर आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीदेखील त्यांना अनेकदा टोकले. शपथविधीची एक पद्धत असते. त्यानुसारच शपथ घ्यावी लागते, पण नव्या सरकारकडून ठरलेल्या पद्धतीनुसार शपथ घेण्यात आली नाही. याविरोधात राज्यपालांकडे याचिका दाखल केली आहे, तसेच त्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही केली आहे. राज्यपालांनी यावर योग्य ती कारवाई न केल्यास सर्वोच्च न्यायालयातही याविरोधात याचिका दाखल होऊ शकते.

नव्या सरकारकडून नियम धाब्यावर बसवून काम करण्यात येत आहे. राज्यपालांकडून हंगामी अध्यक्षांची निवड झाल्यानंतर पुन्हा मतदानाद्वारे अध्यक्ष निवडेपर्यंत तेच अध्यक्ष म्हणून काम पाहतात. त्यांना बदलता येत नाही, मात्र नव्या सरकारने कालिदास कोळंबकर यांना हटवून त्यांच्या जागी दिलीप वळसे-पाटील यांची नियुक्ती केली आहे. काल त्यांनी अध्यक्षपदाची शपथही घेतली. त्यातच आज विश्वासदर्शक ठराव आणि उद्या अध्यक्षपदाची निवडणूक असे पहिल्यांदाच घडत आहे. अध्यक्षपदाची निवडणूक ही गुप्त मतदानाने न करता उघडपणे होत आहे. ही नियमांची पायमल्ली असल्याचे पाटील म्हणाले.

…तर काम करू देणार नाही!

आम्ही समर्थपणे विरोधी पक्षात राहून लढायला तयार आहोत. आमच्या शुभेच्छाही नव्या सरकारसोबत आहेत, परंतु त्यांनी नियम पाळायला हवेत. आमचे मन मोठे आहे. आम्ही उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारले आहे. त्यांनी नियमांप्रमाणे काम करावे. नियमांबाहेर जाऊन काम केल्यास आम्ही त्यांना काम करू देणार नाही, असा इशाराही भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी या वेळी दिला.

विधानसभा अध्यक्षपदासाठी पटोले वि. कथोरे लढत

मुंबई : महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले असून, विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले अर्ज दाखल करणार आहेत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्टकेले, तर भारतीय जनता पक्षाकडून मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Check Also

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी पेणमध्ये सभा

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते …

Leave a Reply