Breaking News

नव्या बदलांमुळे फायदा होईल अशा आणखी पाच कंपन्या

म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीत सेबीने काही बदल केल्यामुळे स्मॉलकॅप आणि मिडकॅप श्रेणीतील कंपन्यांमध्ये म्युच्युअल फंड कंपन्यांची गुंतवणूक वाढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या श्रेणीतील कंपन्या दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी..

मागील लेखातील विषय पुढं चालू ठेवत आपण या लेखात स्मॉलकॅप/मिडकॅप श्रेणीतील आणखी पाच कंपन्यांविषयी जाणून घेऊयात.

ग्रॅन्युएल्स इंडिया :

प्रामुख्यानं ही कंपनी औषधी कंपन्यांना लागणारे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल्स इन्ग्रिडन्ट्स म्हणजेच एपीआय बनवते. त्याचप्रमाणं जगातील सर्वांत मोठी फार्मास्युटिकल्स फॉर्म्युलेशन इंटर्मीडिएट्स (पीएफआय) सुविधा देखील ही कंपनी पुरवते. 75 पेक्षा अधिक देशात 300 हून अधिक क्लायंट्सना ही कंपनी सेवा पुरवते. प्रवर्तकांकडं कंपनीचा 42% हिस्सा आहे. 

बाजारमूल्य : 9018 कोटी रुपये 

विक्रीवृद्धी दर : 22.6 टक्के (मागील तीन वर्षांची सरासरी)

नफावृद्धी दर : 28.2 टक्के (मागील पाच वर्षांची सरासरी)

सरासरी लाभांश : 12.4 टक्के

ग्रॅफाईट इंडिया लिमिटेड :

ग्रॅफाईट इंडिया लिमिटेड (जीआयएल) ही कंपनी ग्रॅफाईट इलेक्ट्रॉड्स तसेच कार्बन आणि ग्रॅफाईट स्पेशॅलिटी उत्पादनांच्या उत्पादनात अग्रेसर आहेत. जीआयएलची उत्पादन सुविधा भारतातील सहा प्लॅन्ट्समध्ये पसरली आहे आणि कंपनीस जर्मनीतील न्यूरेमबर्ग येथे ग्रॅफाइट कोवा जीएमबीएच या नावाने 100 टक्के मालकीची सहाय्यक कंपनी देखील मिळाली आहे. ग्रॅफाईट इलेक्ट्रॉड्स हे स्टील व इतर नॉन-फेरस धातूंचे उत्पादन इलेक्ट्रिक आर्क फर्नेस आणि लाडल फर्नेस मार्गांद्वारे मिळवतात. हे कमी व्होल्टेजवर उच्च प्रवाह आयोजित करण्यासाठी उपभोग्य म्हणून वापरले जाते जे वितळवण्यासाठी आणि व किंवा मिश्र धातु प्रक्रियेसाठी आवश्यक आहे. असे हे इलेक्ट्रॉड्स बनवण्याची कंपनीची क्षमता प्रतिवर्ष 98000 टन आहे. ही कंपनी जवळपास ऋणमुक्त असून पुस्तकी किंमतीच्या जवळपास पाऊण किंमतीत उपलब्ध आहे. प्रवर्तकांकडं कंपनीचा 65.3 % हिस्सा आहे जे एक चांगलं लक्षण मानलं जातं.

बाजारमूल्य : 3572 कोटी रुपये 

विक्रीवृद्धी दर : 28.2 टक्के (मागील तीन वर्षांची सरासरी)

नफावृद्धी दर : -3.15 (मागील पाच वर्षांची सरासरी)

सरासरी लाभांश : 50.6 टक्के  (मागील पाच वर्षांची सरासरी)

कजारिया सिरॅमिक्स :

ग्लेझ्ड व्हिट्रीफाईड टाईल्स, पॉलिश्ड व्हिट्रीफाईड टाईल्स व सिरॅमिक टाईल्स या तीन प्रकारांत टाईल्स उत्पादन करणारी ही भारतातील अग्रगण्य कंपनी असून मागील 30 वर्षांत कंपनीची उत्पादन क्षमता एक दशलक्ष वर्ग मीटरपासून 73 दशलक्ष वर्ग मीटरपर्यंत वाढली आहे. कंपनी एकूण 2800 प्रकारांमध्ये डिझाईन्स उत्पादित करते. कंपनीचे उत्पादन प्रकल्प राजस्थान व गुजरातमध्ये प्रत्येकी दोन असून उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यात प्रत्येकी एक एक प्रकल्प आहे. कंपनी मिडलईस्ट, युरोप, अमेरिका, कॅनडा, आफ्रिका, तैवान, मॉरिशस, व्हिएतनाम, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इत्यादी एकूण 35 देशांमध्ये अशा टाईल्स निर्यात करते. ही कंपनी जवळपास ऋणमुक्त आहे तर प्रवर्तकांकडं कंपनीचा 48 टक्के हिस्सा आहे. 

बाजारमूल्य : 8286 कोटी रुपये 

विक्रीवृद्धी दर : 5.13 टक्के (मागील पाच वर्षांची सरासरी)

नफावृद्धी दर : 5.98 (मागील पाच वर्षांची सरासरी)

सरासरी लाभांश : 19.2 टक्के (मागील पाच वर्षांची सरासरी)

लिंडे इंडिया :

पूर्वी बीओसी इंडिया लिमिटेड असलेली लिंडे इंडिया लिमिटेड ही लिंडे ग्रुपची सदस्य कंपनी आहे. ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, ऍसिटिलीन, कार्बन मोनॉक्साईड, कार्बनडायॉक्साईड इत्यादी. इंडस्ट्रीयल गॅसेस बनवणारी ही भारतातील आघाडीची कंपनी आहे. कंपनीकडं स्वतःच्या मालकीचा असा भारतातील सर्वात मोठा एअर सेपरेशन प्लांट आहे आणि कंपनी देशभरात 20 पेक्षा जास्त उत्पादन सुविधा व फिलिंग स्टेशन चालवितात. तसंच कंपनी 20,000 हून अधिक प्रकारचे वायू व मिश्रणं देखील औद्योगिक मागणीनुसार पुरवितात. तसेच कंपनी विविध प्रकारच्या उद्योगांच्या गरजेनुसार प्लांट, उपकरणे, पाइपलाइन आणि संबंधित अभियांत्रिकी सेवांची बांधकामं व स्थापनेसह संबंधित सेवा पुरवते. कोविडनंतर हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची मागणी वाढल्यानं कंपनीच्या शेअर्सना देखील मागणी आहे. त्यामुळं मार्च मध्ये 400 रुपयांवर असणारा शेअरचा भाव आज दुप्पट आहे. ही कंपनी देखील ऋणमुक्त असून 75% हिस्सा प्रवर्तकांकडं आहे.

बाजारमूल्य : 7085 कोटी रुपये 

विक्रीवृद्धी दर : 3.4 टक्के (मागील पाच वर्षांची सरासरी)

नफावृद्धी दर : 341 टक्के (मागील तीन वर्षांची सरासरी)

सरासरी लाभांश : 34 टक्के (मागील पाच वर्षांची सरासरी)

पॉलीकॅब इंडिया :

1964 साली सिंध इलेक्ट्रिक स्टोर्स या नावानं सुरु झालेली आज 43 देशांमध्ये विस्तारलेली आहे. ही कंपनी दिड वर्षांपूर्वीच शेअरबाजारात दाखल झालेली असून कंपनीचा शेअरभाव वर्षभरातच दुप्पट झाला होता. महामारीमुळं पुन्हा हा शेअर त्याच्या उच्चांकापासून 25 टक्के कमी भावात उपलब्ध आहे. ही कंपनी इलेकट्रीकल्समधील एक दर्जेदार कंपनी ठरत आहे, ब्रँड आहे पॉलीकॅब. प्रामुख्यानं केबल व वायर्स ह्या व्यवसायात असणारी कंपनी आता पंखे, विद्युत दिवे, एलईडी, फिटिंग्स, स्विचेस, स्विचगिअर, सौर उत्पादनं, पंप्स, कुलर्स, वॉटर हीटर्स, इस्त्री या उपकरणांबरोबर टर्न की प्रोजेक्ट्स देखील स्वीकारते. ही जवळपास ऋणमुक्त कंपनी असून 69 टक्के हिस्सा हा प्रवर्तकांकडं आहे.

बाजारमूल्य : 13148 कोटी रुपये 

विक्रीवृद्धी दर : 17.10 टक्के (मागील तीन वर्षांची सरासरी)

नफावृद्धी दर : 47.85 (मागील तीन वर्षांची सरासरी)

सरासरी लाभांश : 11 टक्के (मागील दोन वर्षांची सरासरी)

वर उल्लेखलेल्या कंपन्या या मी माझ्या हिशोबाने मांडल्या आहेत. यामध्ये गुंतवणूक करताना आपल्या रुची, पसंतीनुसार आपल्या वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराशी विचारविमर्श करूनच या कंपन्यांच्या शेअर्सची निवड करावी.

सुपर शेअर : कॅडीला हेल्थकेअर

ही कंपनी बायोटेक्नॉलॉजी, फॉर्म्युलेशन आणि अ‍ॅणक्टिव्ह फार्मास्युटिकल घटकांच्या संशोधन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारी एक सुप्रसिद्ध संशोधन-आधारित, तंत्रज्ञान-आधारित फार्मास्युटिकल कंपनी आहे. ही एक भारतीय आधारित औषधनिर्माण संस्था असून जगभर त्यांची उपस्थिती आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद, अंकलेश्वर आणि वडोदरा, गोव्यातील पोंडा, महाराष्ट्रातील रायगड आणि हिमाचल प्रदेशमधील सोलन येथे त्यांची निर्मितीची सुविधा आहे. कंपनीच्या उपकंपन्यांमध्ये झायडस वेलनेस लिमिटेड, विंड्लास हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड, लिवा फार्मास्युटिकल्स लिमिटेड, बायोकेम फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेड, झायडस टेक्नोलॉजीज लिमिटेड, जर्मन रेमेडीज लिमिटेड, डायलफॉरहेल्थ इंडिया लिमिटेड, डायलफॉरहेल्दी युनिटी लिमिटेड आणि डायलफॉरहेल्थ ग्रीनक्रॉस लिमिटेड यांचा समावेश आहे. कॉम्प्लॅन, ग्लुकॉन-डी, न्यूट्रलाईट, शुगरफ्री, एव्हरयुथ, नायसिल ही सर्व प्रचलित उत्पादनं झायडस वेलनेस या उपकंपनीची आहेत. अशा या कंपनीचा शेअर गेल्या आठवड्यात 14 टक्के उसळला, कारण होतं अमेरिकेच्या आरोग्य नियामकांकडून पोटॅशियम क्लोराईड एक्सटेंडेड रिलीझ टॅब्लेट बाजारात आणण्यास कंपनीला मान्यता मिळाली, हे रक्तातील पोटॅशियमच्या कमतरतेवर उपचार करण्यासाठी किंवा रोखण्यासाठी वापरण्यात येणारं पूरक खनिज आहे. कंपनीच्या शेअर्सनी आज 52 आठवडी नवा उच्चांक नोंदवला असला तरी दीर्घ कालावधीसाठी ही कंपनी फायद्याची ठरू शकते.

-प्रसाद ल. भावे (9822075888)

sharpadvisers@gmail.com

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply