Breaking News

रेल्वेचा जिना प्रवाशांसाठी खुला, पनवेलकरांनी मानले आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल रेल्वे स्टेशनवरील नवीन पनवेलकडे जाण्यासाठी बांधण्यात आलेला मोठा जिना अखेर प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे जिन्यावर होणारी गर्दी कमी होऊन अपघात टळणार असल्याने प्रवाशांनी त्यासाठी प्रयत्न करणार्‍या आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले आहेत.

मध्य रेल्वेच्या पनवेल स्टेशनच्या फलाट क्रमांक 1 ते 4वरून रोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ठाणे आणि अंधेरी अशा 333 लोकलच्या फेर्‍या होतात. याशिवाय फलाट 5 ते 7वरून मेल व एक्स्प्रेसच्या नियमित 57 आणि तीन हॉलिडे एक्स्प्रेस गाड्या जातात. येथून रोज लाखो प्रवासी ये-जा करीत असतात. पनवेलच्या पूर्वेला म्हणजेच नवीन पनवेल बाजूला मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढली आहे. या बाजूला येताना फलाट 5वरील अरुंद जिन्याने वर जावे लागत होते. सकाळ-संध्याकाळी आणि मेलगाडी आल्यावर लोकलच्या प्रवाशांची वर जाण्यासाठी होणारी गर्दी अपघाताला निमंत्रण देणारी ठरत होती. त्यामुळे स्टेशन सल्लागार समितीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामार्फत रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.

पनवेल रेल्वे स्टेशनवरील फलाट क्रमांक 4वर नवीन स्वच्छतागृह बांधण्यात येत आहे. त्याच्यासमोर नवीन जिना बांधण्यात आला आहे. सदर जिन्यावर जाण्याचा मार्ग हा पूर्वीच्या जुन्या जिन्याच्या सुरुवातीच्या अरुंद भागातून ठेवण्यात आल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे या नवीन जिन्याचे काम थांबवून त्याचा वर जाण्याचा मार्ग बदलावा, अशी मागणी सल्लागार समितीने केली होती. आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्याची पाहणी करून तशी सूचना संबंधिताना दिल्यावर त्याप्रमाणे जिना बांधण्यात आला. तो पूर्ण झाल्याने आता प्रवाशांनी त्याचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी होणारी प्रवाशांची अडचण दूर झाली. त्यामुळे प्रवाशांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि  सल्लागार समितीचे आभार मानले आहेत. 

नवीन पनवेलकडे जाणारा जिना अतिशय अरुंद असल्याने नेहमी गर्दीतून त्यावरून जाताना भीती वाटायची. अनेक वेळा धक्काबुक्की सहन करावी लागत असे. नवीन रुंद जिना बांधून आज तो वापरासाठी खुला केल्याने महिलांना गर्दीत होणारी धक्काबुक्की सहन करावी लागणार नाही याचे समाधान वाटत आहे. -सीमा खडसे, महिला प्रवासी

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply