Tuesday , February 7 2023

गंभीर दखल हवीच

जे दुर्दैवाने तिच्या वाट्याला आले त्यात तिचाच काही दोष असावा अशीच भूमिका पोलिसांची वा पुढे सगळ्याच कारवाईत सामोर्‍या येणार्‍यांकडून दिसून येते. याच कारणांपोटी आजवर कित्येक सर्वसामान्यांची अशा प्रकरणांत ते दडपून टाकण्याची भूमिका असे वा असते. संबंधित पीडितेची हत्या झाली असेल तरच बहुदा कुटुंबिय तिच्याकरिता न्याय मिळवण्याच्या मागे लागतात. अन्यथा ही घटना मागे टाकून अन्यत्र कुठेतरी जाऊन नव्याने जीवनास सुरूवात करणे त्यांना अधिक सोयीचे वाटते.
हैदराबादमधील बलात्कार प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेच्या मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खरे तर हा मुद्दा या समस्येवर कोणताही परिणामकारक तोडगा निघालेला नसताना चर्चेतून जातो हीच अत्यंत खेदाची आणि संतापाची बाब आहे. हैदराबादमधील पशुवैद्यकाचे शिक्षण घेणार्‍या पंचवीस वर्षाच्या तरुणीवर गुरुवारी चौघा नराधमांनी सामुहिक बलात्कार केला. तिची हत्या केल्यानंतर त्यांनी तिचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न देखील केला. या घटनेचे वृत्त पसरल्यापासून देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जाता आहे. हैदराबादेत तर लोक शनिवारी रस्त्यावर उतरले. सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या प्रकरणीच्या आरोपींना आमच्या हवाली करा. त्यांचेही आम्ही तसेच हाल-हाल करू, त्यांनाही दगडाने ठेचून मारले पाहिजे अशा मागण्या संतप्त निदर्शकांनी केल्या आहेत. संबंधित दुर्दैवी तरुणीला ताबडतोबीने न्याय मिळवून देण्यासाठी या नराधमांना लगेचच फाशी दिले पाहिजे जेणेकरून पुन्हा कुणाही विकृत व्यक्तीकडून बलात्काराचा विचार केला जाणार नाही अशी भावनाही ठिकठिकाणी व्यक्त होते आहे. निर्भया प्रकरणानंतर ज्या तर्‍हेने देशभरात संतापाची प्रतिक्रिया उमटली होती तशाच स्वरुपाची भावना लोक व्यक्त करीत आहेत. वास्तवत: अत्यंत क्रौर्यपूर्ण अशा बलात्काराच्या कितीतरी घटना देशभरात सतत घडत आहेत. ग्रामीण, शहरी असा भेदही त्यात दिसत नाही. दहा वर्षांच्या मुलींपासून साठीच्या महिलेपर्यंत कुणीही अशा विकृतीला बळी पडते आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे यातील बहुतांश घटना पूर्णपणे दुर्लक्षित राहतात. मोजक्याच प्रकरणांना प्रसारमाध्यमांत प्रसिद्धी मिळते. प्रसिद्धी मिळाली म्हणजे न्याय मिळतोच असे नाही. बलात्काराच्या या ताज्या केसमध्ये संबंधित तरुणी डॉक्टर होती म्हणून की काय देशभरातील संतापाची धार तीव्र आहे. अन्यथा गावखेड्यातील तळागाळातील कित्येक तरुणींच्या वाट्याला लैंगिक अत्याचारासोबतच अत्यंत टोकाची अशी सामाजिक अवहेलनाही येते. या बलात्काराच्या प्रकरणात समोर आलेली आणखी एक बाब म्हणजे पोलिसांकडून दाखवली गेलेली असंवेदनशीलता. संबंधित मुलीच्या कुटुंबियांनी ती न परतल्यामुळे ताबडतोबीने पोलिसांकडे धाव घेतली होती. परंतु पोलिसांनी त्यांना इकडेतिकडे टोलवले व त्यात मोलाचा वेळ वाया गेला. पोलिसांनी लागलीच तिची शोधाशोध सुरू केली असती तर कदाचित किमान तिचा जीव वाचू शकला असता. या प्रकरणात समोर आलेली पोलिसांची हीच वृत्ती अनेक प्रकरणांत दिसते. पीडितेच्या कुटुंबियांना वा स्वत: पीडितेला बलात्कारानंतरही कमालीच्या क्लेशकारक वर्तणुकीला सामोरे जावे लागते हे जगजाहीर आहे. बलात्काराच्या गुन्ह्यांसंदर्भात फाशीची शिक्षा देखील गुन्ह्यांचे प्रमाण खाली आणण्यात प्रभावी ठरताना दिसत नाही. अशा परिस्थितीत अतिशय गंभीर दखल घेऊन या सामाजिक समस्येवर प्रभावी तोडगा काढण्याची गरज आहे. संबंधित सर्व यंत्रणांनी या कामी पुढाकार घेऊन सरकारला मदत करायला हवी आहे.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply