माजी खासदार रामशेठ ठाकूर व शिवाजीनगर ग्रामस्थ मंडळाचे आयोजन
पनवेल : रामप्रहर वृत्त
सदगुरु बाळकृष्ण महाराज यांच्या आशीर्वादाने गव्हाण शिवाजीनगर येथील माऊली मंदिरामध्ये 10 ते 12 डिसेंबर या कालावधीत समर्थ दासबोध, ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरी, एकनाथ भागवत आणि श्री बाळकृष्ण महाराज यांचे गुरू चरित्रामृत ग्रंथांच्या पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. या पारायण पर्वणीचा प्रारंभ मंगळवारी दि. 10 रोजी सकाळी 10 वाजता स. स. बाळासाहेब महाराज नंदेश्वर यांच्या हस्ते होणार असून, गुरुवारी दि. 12 दुपारी 12 वाजता माऊलींवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. दरम्यान, या कालावधीत रोज सकाळी काकड आरती, श्रींची नित्यपूजा, ग्रंथवाचन व ध्यान, संगीत भजन, प्रवचन, रात्री ग्रंथवाचन व ध्यान, भजन, किर्तन, रात्रीचे बारा अभंग व जागर संगीत भजन असे कार्यक्रम होणार आहेत. शिवाजीनगर, गव्हाण, खारकोपर, न्हावे, न्हावेखाडी येथील देवसागर साधक समाज (इंचगिरी सांप्रदाय) यांनी आयोजित केलेल्या या धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि शिवाजीनगर ग्रामस्थ मंडळातर्फे करण्यात आले आहे.