मोहोपाडा ः वार्ताहर
जागतिक एड्स प्रतिबंधात्मक दिनाचे औचित्य साधून श्री समर्थ सामाजिक संस्था रसायनी यांच्यावतीने जनता विद्यालय मोहोपाडामधील विद्यार्थ्यांची जनजागृतीपर रॅली काढून घोषणाबाजी करत एड्स आजाराची माहिती असणार्या पत्रकांचे वाटप करण्यात आले. ही रॅली मोहोपाडा बाजारपेठ, मोहोपाडा गाव, आळी अंबिवली व नवीन पोसरी अशी फिरविण्यात आली. या रॅलीमध्ये मुख्याध्यापक सुपेकर, ठाकरे व इतर शिक्षक प्रतिनिधी, काशिनाथ खुडे, यादव अन्ना आदी उपस्थित होते. त्यानंतर इडीमित्सु कंपनीतील कर्मचार्यांना अरविंद पाटील यांनी मार्गदर्शनाद्वारे एड्स आजाराची संपूर्ण माहिती देऊन कामगार वर्गामध्ये असणारे गैरसमज दूर केले. या वेळी एचआर मॅनेजर स्वप्नीला आंबेकर व डॉ. ज्ञानेश्वर कोळी उपस्थित होते.
श्री समर्थ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेली बारा वर्ष एड्स जागृतीचे कार्य सुरु आहे. पाताळगंगा रसायनी हा औद्योगिक परिसर असल्याने या ठिकाणी असंघटित कामगार मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यांना या आजाराची लागण होऊ नये व या आजाराचे वाढते प्रमाण नियंत्रणात राहावे या उद्देशाने ही जनजागृती करण्यात येते.
-अरविंद पाटील, अध्यक्ष, श्री समर्थ सामाजिक संस्था