Monday , October 2 2023
Breaking News

कारागृहातील पोलिसाला कैद्याच्या भावाची मारहाण

पनवेल ः बातमीदार

तळोजा कारागृहात प्रवेश करण्यासाठी एका कैद्याच्या नातेवाइकाने तळोजा कारागृहाच्या मुख्य दरवाजावर कार्यरत असलेल्या पोलिस शिपायाला धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. फिरोज हनीफ शेख (45) असे या आरोपीचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याला सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करून मारहाण केल्याप्रकरणी अटक केली आहे.

या प्रकरणातील आरोपी फिरोज हनीफ शेख हा मुंबईतील डोंगरी परिसरात रहाण्यास असून त्याचा भाऊ तळोजा कारागृहात बंदिस्त आहे. शनिवारी तो तळोजा कारागृहात भावाला भेटण्यासाठी आला होता. मात्र कैद्यांना भेटण्याची वेळ संपल्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हनीफ भावाला भेटण्यासाठी आतमध्ये जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र तळोजा कारागृहाबाहेरील फाटकावर कर्तव्यावर असलेले पोलिस शिपाई बाबासाहेब वाणी यांनी त्याला आतमध्ये न सोडता कारागृहाचे फाटक बंद करून घेतले. याचा राग आल्याने फिरोजने वाणी यांची कॉलर पकडून त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. तुझे सगळे सिनियर ऑफिसर माझ्या खिशात असून, ते मला काहीच बोलत नाहीत. त्यामुळे तू मला आतमध्ये जाऊ न दिल्यास मी तुला सस्पेंड करेन, अशी धमकी दिली.

या धक्काबुक्कीमध्ये वाणी यांच्या शर्टाचे बटण तुटले, याचवेळी फिरोज शेख याने वाणी यांच्या नाकावर जोरात बुक्की मारून त्यांना दुखापत केली. या मारहाणीमुळे पोलिस शिपाई वाणी यांच्या नाकातून रक्त वाहू लागल्यानंतर त्यांनी मदतीसाठी सहकार्‍यांना बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी आरोपी फिरोज शेख याला पकडून खारघर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्यांनी जखमी पोलिस शिपाई वाणी यांना प्रथम तळोजा कारागृहातील दवाखान्यामध्ये नंतर महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी वाणी यांनी खारघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी फिरोज शेख याच्यावर सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे, धमकी देणे अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Check Also

 लोकनेते दि.बा.पाटील नामकरण कृती समितीतर्फे सर्व आजी माजी आमदारांची लवकरच बैठक

पनवेल : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात …

Leave a Reply