Breaking News

स्टोन क्रेशर बंद करा, अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषण; माणगाव तालुक्यातील चांदे येथील आदिवासींचा इशारा

माणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील निजामपूर ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील चांदे आदिवासीवाडीजवळ असलेले  स्टोन क्रेशर बंद करावे, अन्यथा येत्या 1मार्चपासून माणगाव तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा  चांदे आदिवासीवाडीतील ग्रामस्थांनी दिला आहे. चांदे आदिवासीवाडीजवळ असलेल्या स्टोन क्रेशरमध्ये करण्यात येणार्‍या सुरूंग स्फोटांमुळे चांदे आदिवासीवाडीतील घरांना हादरे बसत आहेत. त्यामुळे घरावरील पत्रे, कौले व घराचे नुकसान होत आहे. तसेच सुरूंग स्फोटांच्या हादर्‍यामुळे ग्रामपंचायतीने दिलेल्या बोअरिंगची पाणी पातळी घटत आहे. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याचे ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या क्रेशरमुळे हवेत धुळीचे कण पसरत असून त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येत आहे. या स्टोन क्रेशरची चौकशी करून त्याला दिलेल्या परवानग्या रद्द कराव्यात, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या या निवेदनावर निजामपूर ग्रामपंचायत सदस्य विष्णू रामा जाधव तसेच चांदे आदिवासीवाडीतील यशवंत मारुती घोगरेकर, चंदर भिकू पवार, शाम सहदेव वाघमारे, दाजी सोनू वाघमारे, यांच्यासह 30 ते 35 ग्रामस्थांच्या स्वाक्षर्‍या आहेत. त्यांनी या निवेदनाच्या प्रती निजामपूर ग्रुपग्रामपंचायत, माणगाव उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, प्रदूषण नियंत्रण मंडळ -महाड, माणगाव पोलीस ठाणे यांच्याकडेही दिल्या आहेत.

आमचे क्रेशर हे कडापे ग्रामपंचायत हद्दीत असून, क्रेशर व्यवसायासाठीच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या घेतल्या असून, या क्रेशरपासून आदिवासी ग्रामस्थांना कोणताही त्रास होत नाही. आमच्या खदानमध्ये पाणी आहे. ते कमी होत नाही. तेव्हा आदिवासी ग्रामस्थांचे पाणी कमी होण्याचा प्रश्नच येत नाही.

-भागेश हरिचंद्र करावडे,  जय संतोषी माता स्टोन क्रेशर

चांदे आदिवासीवाडीतील ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर  निजामपूर ग्रामपंचायतीने तत्काळ संबंधित क्रेशर मालकाला  नोटीस देवून सुरूंग स्फोट बंद करावेत, असे कळवले. तसेच ग्रामपंचायतीने मासिक सभा घेऊन ही कॉरी बंद करण्याबाबत ठराव केला असून, तसे जिल्हाधिकार्‍यांना कळवले आहे.

-राजाभाऊ रणपिसे, सरपंच, निजामपूर ग्रुपग्रामपंचायत

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply