अलिबाग : प्रतिनिधी
महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फौंडेशन (एमव्हिएसटीएफ) आणि युनिसेफ इंडिया यांनी भारत सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत जल शक्ती अभियानातून रायगड जिल्ह्यातील 7 तालुक्यांमधील 22 ग्रामपंचायतीमधील 58 महसूली गावांमध्ये 46 बांधकामे करुन जलस्तोत्रे बळकट केली.
केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशन पाठोपाठ जल जीवन मिशन हा 2024 पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्याचा समयबद्ध प्रकल्प सुरु केला आहे. केंद्र पातळीवर जल शक्ती मंत्रालय स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने राज्यात जलाशय खोदणे, जलाशयांचे पुनर्भरण आणि विस्तार, प्रक्रिया न होणार्या पाण्याचे व्यवस्थापन तसेच पाणी जमिनीत मुरवून उपलब्ध जलस्रोतांना बळकटी देणे अशा उद्दिष्टांसह मजल शक्ती अभियानफ ही पाणी बचतीसाठीची राज्यव्यापी मोहीम सुरु केली.
जल शक्ती अभियानाच्या निकषानुसार महाराष्ट्रात 8 जिल्ह्यांमधील 20 गटांची निवड झाली होती. राज्य सरकारने या 20 गटांमध्ये मोहीम राबविलीच, परंतु आपल्या सर्व खात्यांमार्फत तसेच सहयोगी संस्थांमार्फत संपूर्ण राज्यात मोहीम नेली. रायगड जिल्ह्यातदेखील ही मोहीम राबविण्यात आली.
एमव्हिएसटीएफने राज्यातील 25 जिल्ह्यांच्या 96 गटांमधील 450 ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात 850 खेड्यांमध्ये युनिसेफच्या तांत्रिक सहयोगाने जल शक्ती अभियान सुरु केले आहे. 450 पैकी 300 ग्रामपंचायती अभियानात सहभागी झाल्या. रायगड जिल्ह्यातील 7 तालुक्यांमधील 22 ग्रामपंचायतीतील 58 महसूली गावांमध्ये हे अभियान राबवून 46 बांधकामे करुन जलस्तोत्रे बळकट करण्यात आली. त्यासाठी 2 लाख 73 हजार 700 रुपये खर्च आला असून त्याचा लाभ 10 हजार 464 कुटूंबांना होणार आहे.