लोणावळा ः प्रतिनिधी
लोणावळा येथील सुनील वॅक्स म्युझियममध्ये गल्ल्यामधील दोन लाख रुपये, दोन संगणकाचे मॉनिटर व एक एलइडी टीव्ही असा दोन लाख 45 हजारांचा मुद्देमाल चोरून राजस्थान येथे पोबारा केलेल्या तीन जणांना लोणावळा पोलिसांनी अटक केली आहे. वॅक्स म्युझियमचे व्यवस्थापक अनिलकुमार तामराशन यांनी या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मोतीराम ओटावत (22), हरिराम चव्हाण (20) व शंकर चौहान (23) अशी या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 27 मार्च रोजी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास आरोपींनी तोंडाला कपडा बांधत बंद दरवाज्याच्या ग्रिलमधून आतमध्ये प्रवेश केला. कॅश काऊंटरमधील दोन लाख रुपये रोख, दोन मॉनिटर व एक एलइडी टीव्ही चोरून थेट राजस्थानला पोबारा केला होता. चोरट्यांपैकी दोन जणांनी वॅक्स म्युझियमच्या कॉपी शॉपमध्ये पूर्वी काम केलेले असल्याने त्यांना या ठिकाणची माहिती होती. घटनेची माहिती समजताच लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील व स्थानिक गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड, वैभव सुरवसे, सामिल प्रकाश, राम जगताप यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवत राजस्थान गाठले. त्या ठिकाणी तिन्ही आरोपींना एक लाख 42 हजार रुपयांची रोकड व एक मॉनिटर याच्यासह ताब्यात घेतले. या प्रकरणी तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.