Tuesday , March 21 2023
Breaking News

महाराष्ट्रात विधानसभेची मुदतपूर्व निवडणूक अशक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती; चर्चेला पूर्णविराम

नागपूर : प्रतिनिधी

महाराष्ट्राची विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय आज रात्री घेण्यात येईल आणि लोकसभेसोबतच विधानसभेची निवडणूक होईल, अशी चर्चा गुरुवारी (दि. 7) सकाळपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरून बरेच तर्कवितर्कही लढवले जाताहेत, परंतु हे वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे म्हटलं. महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणूक होणार नाही हे लिहून घ्या, अशा शब्दांत त्यांनी या चर्चेवर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. लोकसभेसोबत विधानसभेची निवडणूक घेतली जाईल, असे दावे गेल्या काही दिवसांपासून केले जात होते. विरोधी पक्षातील काही नेत्यांनी राज्यात मुदतपूर्व निवडणूक होणार असल्याची विधानं केली होती. महाराष्ट्र आणि हरियाणाची विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय  रात्री दिल्लीत होणार्‍या उच्चस्तरीय समितीकडून घेतला जाईल, अशी जोरदार चर्चा सकाळपासून सुरू होती. त्यामुळे दोन्ही निवडणुका एकत्र होणार का, याबद्दल विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत, मात्र ही चर्चा संपूर्णपणे निराधार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक होणार या चर्चेत तथ्य नसल्याचं फडणवीस म्हणाले. गेल्या 48 तासांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे विधानसभेची निवडणूक लोकसभेसोबतच होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. गेल्या दोन दिवसांत राज्याच्या कॅबिनेटनं निर्णयांचा धडाका लावला आहे. फडणवीस सरकारनं अनेक महत्त्वपूर्ण जीआर काढले आहेत. याशिवाय सरकारकडून उद्घाटनं आणि भूमिपूजन कार्यक्रमांचं आयोजनदेखील केलं जात आहे. राज्यात अधिकचे ईव्हीएम आणण्यासाठीदेखील हालचाली सुरू आहेत. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यात मुदतपूर्व निवडणूक होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी असाच दावा केला होता. 28 फेब्रुवारीला विधानसभेचं अधिवेशन संपताच मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करतील आणि लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुकादेखील घेतल्या जातील, असं चव्हाण म्हणाले होते. त्या वेळीही मुख्यमंत्र्यांनी हे विधान चुकीचं असल्याचं म्हटलं होतं.

राज्यात लोकसभा निवडणुकीबरोबरच राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार नाहीत हे मी लिहून देण्यास तयार आहे. आमचे सरकार कालावधी पूर्ण करील, यात शंका नाही.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Check Also

शासकीय कर्मचार्‍यांचा संप अखेर मागे!

सरकासोबत चर्चा यशस्वी मुंबई : प्रतिनिधी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांचा संप …

Leave a Reply