Friday , March 24 2023
Breaking News

ट्रकखाली चिरडून एकाचा मृत्यू

पनवेल : वार्ताहर

तळोजा येथील टी.सी.आय.एक्स्प्रेस कंपनीत घडलेल्या विचित्र अपघातात एका ट्रकचालकाचा त्याच्याच ट्रकखाली येऊन दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली. श्याम अशोक धुसाणे (38) असे या ट्रकचालकाचे नाव आहे. या घटनेला दुसरा ट्रकचालक जबाबदार असल्याचे तपासात आढळून आल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील मृत ट्रकचालक श्याम धुसाणे हा मालेगाव येथे राहण्यास होता, तसेच तो भिवंडी येथील मिथुज मार्केटिंग प्रा. लि. कंपनीत चालक म्हणून काम करीत होता. श्याम धुसाणे हा मालवाहू ट्रक घेऊन तळोजा रोहिंजण येथील टी.सी.आय. एक्स्प्रेस कंपनीमध्ये गेला होता. या वेळी त्याच्यासोबत दुसरा चालक जितेंद्र पवार (27) हादेखील होता. ट्रकमधील माल कंपनीत रिकामा होत असल्याने चालक श्याम व जितेंद्र हे दोघेही ड्रायव्हरच्या केबिनमध्ये झोपले होते. मात्र काही वेळानंतर श्याम धुसाणे हा कधी ट्रकच्या खाली जाऊन झोपला हे कुणालाच समजले नाही. दरम्यान, पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ट्रकमधील माल रिकामा झाल्यानंतर कंपनीतील हमालाने ट्रकमध्ये झोपलेल्या चालक जितेंंद्रला उठवून ट्रक पुढे घेण्यास सांगितले. त्यामुळे झोपेत असलेल्या जितेंद्रने लागलीच ट्रक पुढे घेतला. याचवेळी ट्रकच्या खाली झोपलेल्या श्यामच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे श्यामला तत्काळ एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, ट्रकचालक जितेंद्र पवार याने ट्रकच्या खाली कुणी झोपला असल्याची खात्री न करता ट्रक चालविल्याने श्याम धुसाणे याचा मृत्यू झाल्याचे आढळून आल्याने तळोजा पोलिसांनी ट्रकचालक जितेंद्र पवार याच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply