Thursday , March 23 2023
Breaking News

रायगड सुरक्षा मंडळात एक हजार सुरक्षा रक्षकांची होणार भरती

पनवेल : रामप्रहर वृत्त

ऑगस्ट 2017 मध्ये शासनाची मंजुरी मिळूनदेखील सुरक्षा रक्षकांची भरती न करणार्‍या सुरक्षा मंडळाला सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मागणी वजा सूचना केल्यानंतर मार्चअखेर एक हजार सुरक्षा रक्षकांची भरती करण्याचे रायगड सुरक्षा मंडळाने ठरविले आहे. रायगड सुरक्षा मंडळामध्ये मुख्य मालक म्हणून नोंदीत आस्थापनांना, मंडळाचे सुरक्षा रक्षक पुरवणे बंधनकारक आहे. एक हजार सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्याच्या प्रस्तावाला ऑगस्ट 2017 मध्ये शासन मंजुरी मिळूनदेखील त्याची अंमलबजावणी न करता सुप्रीम कोर्टाने ज्यांचा व्यवसायच बेकायदेशीर ठरवला आहे. अशा बनावट खाजगी सुरक्षा एजन्सीकडील सुरक्षा रक्षकांची भरती केली जात होती. काही एजन्सी अशा गरजू तरुणांकडून 15 ते 20 हजार रुपये घेऊन त्यांना नोकरी देत असत. याबाबत भारतीय मजदूर संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश पाटील आणि सुरक्षा संघटक प्रमोद ठाकूर यांनी हा गैरप्रकार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यांनी असा गैरप्रकार थांबविण्यासाठी आणि शासनाच्या निदेशांनुसार भरती प्रक्रिया राबविण्यासंबंधी रायगड सुरक्षा मंडळाच्या अध्यक्षांना पत्र दिले असता त्यांनी सध्या मंडळाने जाहिरात देऊन सुरू केलेली प्रक्रिया ही खाजगी एजन्सीकडे सध्या किती सुरक्षा रक्षक काम करतात याची माहिती संकलित करण्यासाठी असून, या सुरक्षा रक्षकांना मंडळामध्ये थेट नोंदीत करून घेण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले. मंडळामध्ये एक हजार सुरक्षा रक्षकांचा समुच्चय तयार करण्यासाठी 15 मार्चपर्यंत वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देण्यात येईल. मंडळाने सुरक्षा रक्षकांसाठी निश्चित केलेले 22 हजार 797 रुपये महिना या किमान वेतनाचे सर्क्युलरदेखील 15 मार्चपर्यंत प्रसिद्ध केले जाईल, असे आश्वासन मंडळाचे अध्यक्ष दिनेशचंद्र दाभाडे यांनी दिले आहे. या वेळी सुरेश पाटील यांच्या समवेत प्रमोद ठाकूर, राजेंद्र घरत, मंडळाचे निरीक्षक मारुती पवार उपस्थित होते.

Check Also

सराईत सोनसाखळी चोरांना अटक

जवळपास पावणेपाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत पनवेल : वार्ताहर खारघर, उलवेसह नवी मुंबई परिसरात …

Leave a Reply