Tuesday , February 7 2023

नोकरीच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक

तोतया अधिकारी चार महिन्यांपासून फरार

कर्जत ः प्रतिनिधी

आपण मंत्रालयात गृहविभागात अव्वल सचिव आहोत, असे भासवून अनेकांची फसवणूक करण्याची घटना घडली आहे. तोतया अधिकार्‍याने सरकारी नोकरी लावण्यासाठी तसेच बदली करण्यासाठी व विकासकामांना निधी मंजूर करण्यासाठी लाखो रुपये लांबविले आहेत. दरम्यान, तोतया अधिकारी आपले पितळ उघडे पडल्याने चार महिन्यांपासून फरार आहे, तर आरोपी असलेली पत्नी जाब विचारायला गेल्यास गुन्हे दाखल करण्याची धमकी देत आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात 190/2019 कलमाखाली गुन्हा दाखल असून, आरोपी फरार आहे.

तोतया अधिकारी संकेत कांबळे व स्टेशन परिसरात राहणारे स्वप्नील लिंडाईत यांची मैत्री होती. स्वप्नील लिंडाईत यांच्या घरी गेल्यावर कांबळेसमोर लिंडाईत यांनी पनवेल तालुक्यातील शाळेत शिक्षिका असलेल्या बहिणीच्या बदलीचा विषय निघाला. त्यावेळी कांबळेने त्या कामासाठी चार लाख रुपये लागतील, असे सांगून त्यातील दोन लाख रुपये आपली पत्नी यामिनी कांबळे यांच्या नावे बँक  खात्यात ट्रान्सफर केले. त्यानंतर त्या तोतया अधिकार्‍याने स्वप्नील लिंडाइत यांच्याकडे त्यांच्या बहिणीचे काम होण्यासाठी त्यांचे डेबिट कार्ड वापरून आयफोन व महागडे घड्याळ घेतले, मात्र वर्षे होत आले तरी तुमचे काम प्रोसेसमध्ये असून लवकरच होईल, असे तो सांगत होता.

जानेवारी 2019पासून आरोपी संकेत कांबळेने नेरळमधील अनेकांना सरकारी नोकरी लावण्याचे आश्वासन देऊन पैसे उकळले आहेत. यासह तलावाचे काम करण्यासाठी, रस्त्याच्या कामाचा ठेका मिळवून देण्यासाठी लाखो रुपये उकळले आहेत, असे नेरळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात स्पष्टपणे नोंदविले आहे. विनंती करूनही बदली होत नाही व मागणी करूनही पैसे परत मिळत नाहीत हे समजल्याने आपली फसवणूक झाल्याचे समजताच स्वप्नील लिंडाईत यांनी नेरळ पोलीस स्टेशन गाठून रीतसर तक्रार दाखल केली आहे.

नेरळ पोलीस ठाण्यात संकेत कांबळे व यामिनी कांबळे या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील अधिक तपास करीत आहेत, मात्र आरोपी संकेत कांबळे सप्टेंबर 2019पासून फरार आहे, तर यामिनी कांबळे त्यांच्या घरी पैसे मागायला गेलेल्यांनाच गुन्हे दाखल करण्याची धमकी देत आहेत.

Check Also

नवी मुंबई ते मुंबई आता फक्त 50 मिनिटांत

बेलापूर-गेटवे वॉटर टॅक्सी सेवा सुरू नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया …

Leave a Reply