Breaking News

एक गाव, एक कुटुंब, एक गणपती!; रोहा पिंगळसई येथील देशमुख तरुण मंडळाची परंपरा

रोहे ः प्रतिनिधी

एक गाव, एक कुटुंब, एक गणपती ही संकल्पना जपणारे पिंगळसई (ता. रोहा) येथील देशमुख तरुण मंडळ या वर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करीत आहे. रोहा तालुक्यातील प्रत्येक गावाने आपले वैशिष्ट्य आजपर्यंत जोपसले आहे. त्यातीलच वारकरी परंपरा रूजवणारे म्हणून ओळख असलेले रोहा तालुक्यातील पिंगळसई येथील देशमुख तरूण मंडळ होय. आज कुटुंब पद्दती विखुुरली जात असताना त्यांचे सण, उत्सवही विखुरले गेले आहेत. मात्र एकच कुंटुंब, एकच उत्सव ही परंपरा गेली कित्येक वर्षे पिंगळसई गावातील देशमुख तरूण मंडळाने जोपासली आहे. नाती व स्नेहभाव जोपसणारा उत्सव अशी देशमुख तरूण मंडळाच्या गणेशोत्सवाची ओळख आहे.  राज्याच्या कानाकोपर्‍यात व राज्याच्या बाहेर गेलेले सदस्य या उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येतात. या वर्षीही देशमुख तरूण मंडळाने मोठ्या धुमधडाक्यात मिरवणूक काढीत आपल्या लाडक्या गणरायाला आणले आहे. कुंडलिका नदीच्या तीरावर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानी पुनित झालेल्या अवचितगडाच्या पायथ्याशी रोहे शहरापासून दीड ते दोन किमी अंतरावर पिंगळसई हे गाव आहे. या गावात वारकरी परंपरा आजही तेवढ्याच भक्तीभावाने जापसली जात आहे.  श्री योगेश्वरी मातेचा वरदहस्त असलेले पिंगळसई हे गाव असून या गावात अन्य जातींच्या कुटुंबांसह मोठ्या प्रमाणात देशमुख कुटुंबे राहतात. येथील देशमुख कुटुंबांचे सगळे उत्सव एकत्रित एकाच ठिकाणी होत असतात. या गावात 12 पिढ्या म्हणजेच 350 वर्षापासून अधिककाळ देशमुख कुटुंबांचा एक गाव एक गणपती हा उत्सव आदर्श देशमुख तरूण मंडळाने आजही जोपसला आहे. कुटुंब मोठे झाले की, त्याचा विस्तार वाढतो. त्यांचे उत्सव, सण व अन्य कार्यक्रमात विभक्तपणा येतो.परंतु गेली शेकडो वर्षे पिंगळसई गावाने ‘एक कुटुंब, एक गणपती हा उत्सव‘ ही परंपरा जतन केली आहे. या उत्सवात सर्व कुटुंबे व त्यातील सदस्य हा उत्सव आपला आहे, या भावनेने तो यशस्वी करण्यासाठी झटत असतात. यासाठी येणारा खर्च देशमुख तरुण मंडळातील कुटुंबे वर्गणी काढून करीत असतात. रोहा शहरातून या मंडळाच्या गणेश मिरवणुकीला सुरूवात होते. वाजत गाजत गुलालाचे उधळण करीत देशमुख कुटुंबांचे प्रमुख ज्येष्ठ कार्यकर्ते, तरूण मंडळाचे कार्यकर्ते व लहान मुले मिरवणुकीने गणरायाला पिंगळसई गावात आणतात. विधीवत पूजा करून आनंदमय वातावरणात गणरायाला विराजमान करतात. गेली कित्येक वर्षे एकाच ठिकाणी देशमुख तरूण मंडळाचे सार्वजनिक कार्यक्रम होत असतात.  नव्या पध्दतीने तयार करण्यात आलेल्या जागेत गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. आरतीसह अन्य आध्यात्मीक कार्यक्रमास गावातील देशमुख परिवारातील सर्वच अबालवृध्दांपासून ज्येष्ठांसह महिला सदस्य उपस्थित राहतात. नोकरीनिमित्त जे बाहेरगावी गेले आहेत, तेही या उत्सवास आवर्जून हजेरी लावीत असतात. वर्षातून एकदा का होईना त्या निमित्ताने देशमुख परिवारातील सदस्य एकत्र येत असतात. भजन, किर्तन, महिला मंडळांचे हळदीकुंकु, पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रम आदींसह लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडत असतात. या उत्सवास भेट देणार्‍या अधिकारी व मान्यवरांचे आदरतीथ्य केले जाते.गणरायाचे आगमन झाल्यापासून नवस, आरती अन्य कार्यक्रम चांगल्या प्रकारे सुरू आहेत. हा संपूर्ण गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी देशमुख परिवारांचे सदस्य जातीने लक्ष देऊन परिश्रम घेत असतात.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply