पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांचे प्रतिपादन
पेण : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामुळे पेण नगर परिषद हद्दीतील विविध विकासकामांना गती मिळाली असून, त्यापैकी काही विकासकामांचे भूमिपूजन बुधवारी (दि. 6) सकाळी करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. माजी मंत्री रवीशेठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आदी मान्यवरांच्या हस्ते बुधवारी सकाळी 10 वाजता विविध विकासकामांचा भूमिपूजन, उद्घाटन व लोकार्पण सोहळा होत असल्याचे नगराध्यक्षा पाटील यांनी सांगितले. सोहळ्यास शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन, भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन, पेणचे उपनगराध्यक्ष दीपक गुरव, नगर परिषदेतील गटनेते अनिरुद्ध पाटील, भाजप जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, जि. प. चे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, युवा नेते ललित पाटील, कामगार संघटना कोकण अध्यक्ष विनोद शहा, मुख्याधिकारी अर्चना दिवे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका व नागरिक उपस्थित राहणार आहेत. या वेळी प्रशांत ओक, अजय क्षीरसागर, हितेश पाटील आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेनंतर नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्यासह गटनेते अनिरुद्ध पाटील, मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी स्टेडियममधील पॅव्हेलियनच्या बांधकामाची पाहणी केली.