नवी मुंबई मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेची कारवाई
पनवेल, कळंबोली ः वार्ताहर
अवैध अग्निशस्त्र बाळगणार्या एका इसमास एक देशी बनावटी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसांसह मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा, नवी मुंबईच्या पथकाने गजाआड केले आहे. नवी मुंबई येथील मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेत कार्यरत असणारे पोलीस नाईक नवनाथ कोळेकर यांना त्यांच्या बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार एक व्यक्ती विवेक हिंदुस्थान हॉटेलजवळ नावडे फाटा पनवेल येथे येणार असून त्याच्याकडे बेकायदेशीर अग्निशस्त्रे आहेत. त्यानुसार पोलीस उपायुक्त प्रवीण पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर, हवालदार ज्ञानेश्वर बनकर, पोलीस नाईक विजय पाटील, नवनाथ कोळेकर, सचिन धनवटे, शिपाई मेघनाथ पाटील आदींच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून आरोपी विशाल मधुकर माने (वय 25, रा. सेक्टर 6, कळंबोली) याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आढळून आल्याने त्याच्याविरूद्ध तळोजा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. त्या आरोपीने ते अग्निशस्त्र तसेच काडतुसे कुठून आणली व तो कोणत्या कामासाठी वापरणार होता याचा तपास कोल्हटकर करीत आहेत.
गुन्हेगारीचे वाढते प्रमाण
पनवेल, नवी मुंबई परिसरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनापुढे अशा गुन्हेगारांचा छडा लावण्याचे वेळोवेळी आव्हान ठरत आहे. अशा प्रकारे एका अवैध अग्निशस्त्र बाळगणार्या व्यक्तीला नवी मुंबई परिसरातून रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या व्यक्तीकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन काडतुसे सापडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.