Breaking News

पायर्‍यांवर धक्काबुक्की

ज्या विधानभवनामध्ये जनहिताचे कायदे केले जातात, त्या पवित्र सार्वभौम सभागृहाच्या पायर्‍यांवर लोकांनी निवडून दिलेल्या आमदारांनी एकमेकांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली ही बाब महाराष्ट्राला निश्चितच शोभादायक नाही. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या प्रतिनिधींना विधिमंडळात लोकांनी निवडून पाठवलेले असते. त्यांच्याकडून जबाबदार वर्तनाची अपेक्षा असते. परंतु बुधवारी सकाळी विधान भवनाच्या पायर्‍यांवर वेगळेच चित्र पाहायला मिळाले. गेले दोन दिवस विरोधी पक्षांच्या आमदारांनी याच पायर्‍यांवर वाईट-साईट शब्दांत सत्ताधार्‍यांच्या विरोधात घोषणाबाजी करून मर्यादाभंग केला होता. ‘पन्नास खोके, सगळं ओक्के’ किंवा ‘पन्नास खोके, माजले बोके’ असल्या घोषणा फारशा पचनी पडणार्‍या नव्हत्या. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार व मंत्री शांत राहिले. महाविकास आघाडीच्या हातातून सत्ता गेल्यानंतर त्यांची अवस्था भ्रमिष्टासारखी झाली आहे. सत्ताधार्‍यांची कोंडी करण्यासाठी विरोधीपक्षांकडे विधिमंडळात नियमांच्या स्वरुपात अनेक अमोघ अस्त्रे उपलब्ध असतात. विरोधीपक्ष नेता कसा असावा याचे उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी गेले अडीच वर्ष घालून दिले होते. त्यांचे विधिमंडळातील चातुर्य आणि वर्तन लक्षात ठेवले असते तर महाविकास आघाडीच्या आमदारांना विधानभवनाच्या पायर्‍यांवर बसून अचकट-विचकट शेरेबाजी करण्याची वेळच आली नसती. वास्तविक महाराष्ट्रातील राजकीय वैमनस्य खर्‍या अर्थाने असले तर ते शिवसेनेच्या शिंदे समर्थक गटात आणि ठाकरे समर्थक गटामध्ये आहे. ठाकरे समर्थक आमदारांनी वैफल्यग्रस्ततेतून काही प्रमाणात घोषणाबाजी केली असती तर ते समजून घेण्याजोगे ठरले असते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी आणि रोहित पवार यांसारख्या नेत्यांनी घोषणाबाजीत सर्वाधिक उत्साह दाखवला. या घोषणाबाजीचे पर्यवसान अखेर धक्काबुक्कीत आणि शिवीगाळीत झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल मिटकरी यांना सुरूवातीपासूनच काहीबाही शेरेबाजी करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचे कसब साधले आहे. अर्थात अशा वर्तनामुळे प्रसिद्धी वाढते की लौकिक कमी होतो याचे तारतम्य त्यांनीच ठेवणे इष्ट होईल. मिटकरी यांचा स्वभाव आणि त्यांचे राजकारण कुठल्या पातळीचे आहे हे सारा महाराष्ट्र जाणतो अशी कडवट प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली, ती काही उगाच नव्हे. गेले दोन दिवस महाविकास आघाडीचे आमदार विधानभवनाच्या पायर्‍यांवर आरडाओरडा करत होते, तेव्हा सत्ताधारी पक्षाने प्रचंड संयम दाखवला. तेवढी प्रगल्भता महाविकास आघाडीच्या नेत्यांना काही दाखवता आली नाही. मंगळवारी सभागृहामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचा अंत पाहू नका, आमच्या सहनशक्तीलाही मर्यादा आहेत अशा कडक शब्दांत इशारा दिला होता. आमदार महेश शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्यात झालेली धक्काबुक्की बुधवारी मात्र चर्चेचा विषय ठरली. अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्राच्या जनतेला निश्चितच आवडणार नाहीत याचे भान दोन्ही बाजूंनी ठेवणे आवश्यक आहे. गेले अडीच वर्ष महाविकास आघाडीने घातलेल्या घोळांचा हिशेब शिंदे-फडणवीस सरकारने तपासून पाहण्याचे ठरवले आहे. हेच पायर्‍यांवर आरडाओरडा करणार्‍या विरोधी आमदारांचे खरे दुखणे आहे. आपल्या भानगडी बाहेर येऊ नयेत म्हणून आधीपासूनच कांगावा करण्याचा हा पवित्रा नवा नाही. धक्काबुक्की आणि शिव्यागाळीचे लांछनास्पद प्रकार टाळून सभागृहामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यास साह्य केले तर ते विरोधकांच्याच फायद्याचे ठरेल. परंतु तेवढे तारतम्य महाविकास आघाडीचे आमदार दाखवतील का हा खरा प्रश्न आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply