पादचारी व वाहनचालकांना करावी लागतेय कसरत
खडी उखडलेल्या मार्गाने पायपीट; आदिवासींमध्ये संताप
उरण ः प्रतिनिधी
उरण तालुक्यातील रानसई आदिवासी वाड्यांवरील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, पादचारी आणि लहानसहान वाहनचालकांची या रस्त्यातून जाताना कसोटी लागते. मागील चार वर्षांपूर्वी अन्वरशेठ शाबाजकार यांच्या फार्म हाऊसपासून ते खैरकटी वाडी, भुर्याची वाडी, मार्गाची वाडी, बंगल्याची वाडी, कोंड्याची वाडी व सागाची वाडी अशा रानसई ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वाड्यांवर जाण्यासाठी रस्त्याची निर्मिती करण्यात आली.
मात्र या चार किमी रस्त्याची जागोजागी खडी उखडली असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. आदिवासी बांधवांची शाळकरी मुले, रुग्ण आणि वयोवृद्ध नागरिक आणि महिलांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा रस्ता साकारणार्या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली असून, रस्त्यातून चालणेही मुश्कील होऊन बसले आहे. येथील आदिवासींना याच खडी उखडून चाळण झालेल्या रस्त्यातून पायपीट करावी लागत आहे.
रानसई येथील सहा आदिवासी वाड्यांतील आदिवासींना मागील कित्येक वर्षांपासून डोंगराळ भागाच्या कडेकपारीतून ये-जा करावी लागत होती, मात्र या रस्त्याची निर्मिती झाल्यानंतर येथील आदिवासी बांधवांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता, परंतु अल्पावधीतच या रस्त्याची दुर्दशा झाल्याने आदिवासींमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
रानसई आदिवासी रस्त्याची अतिशय वाईट अवस्था झाली असून, रात्री अपरात्री आजारी व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये पोहचविण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. या रस्त्यातून चालत असो अथवा गाडीने आमची कसोटी लागते. अनेक वेळा तक्रार करूनदेखील आदिवासी बांधवांच्या या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. त्यामुळे राज्य शासन किंवा रायगड जिल्हा परिषदेने आदिवासींसाठी पक्क्या डांबरीकरण रस्त्याचे काम पूर्ण करून द्यावे.-रमेश सोमा भला, आदिवासी नागरिक, रानसई-मार्गाची वाडी