Breaking News

फसवेगिरी करणार्या शेकापची विकेट जनताच काढणार! आमदार प्रशांत ठाकूर यांचा घणाघात

अलिबाग : प्रतिनिधी

शेतकरी कामगार पक्षाच्या पुढार्‍यांनी अलिबागच्या जनतेला वर्षानुवर्षे फसविले आहे. सत्ताधार्‍यांना डबे पोहचवून त्यांनी स्वतःचा विकास केला. जनतेसाठी काहीच केले नाही. जनता आता शहाणी झाली आहे. आता ती फसणार नाही. या वेळी जनता मतदानातून शेकापची विकेट काढणार, असा घणाघात भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 10) केला. अलिबाग तालुक्यातील साहण बायपास येथील गणेश मंगल कार्यालयात आयोजित अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघाच्या भाजप पदाधिकारी बूथ कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

या मेळाव्यास माजी केंद्रीय मंत्री शिवसेना नेते अनंत गीते, भाजपचे अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, शिवसेना नेते विजय कवळे, जि. प. तील विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, युतीचे उमेदवार महेंद्र दळवी, पं. स. सदस्य उदय काठे, भाजप अलिबाग तालुका अध्यक्ष हेमंत दांडेकर, मुरूड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, शिवसेना अलिबाग तालुकाप्रमुख राजा केणी, दीपक रानवडे, विलास चावरी, अ‍ॅड. परेश देशमुख, अनंतराव देशमुख, प्रकाश धुमाळ, मनोज धुमाळ, जयंत अंबाजी, परशुराम म्हात्रे, संजय कोनकर, सुनील दामले आदी उपस्थित होते.

आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, शेकापचे नेते नेहमी सांगत असतात की आम्ही विरोधी पक्षातील आमदार. ते खोटं बोलतात. ते नेहमी सत्ताधार्‍यांबरोबरच असतात. सत्ताधार्‍यांना डबे पोहचवून ते आपली कामे करतात. त्यांच्याकडे जिल्हा परिषद आहे. पंचायत समिती आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. विविध सहकारी संस्था आहेत. या माध्यमातून ते सत्ता भोगतात. जनतेची पिळवणूक करतात, पण जनतेने आता बदल करायचे ठरवले आहे. अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघात बदल हा होणारच.

आपल्या कामासाठी भाजपशी सलगी करायची आणि भाजपच्याच कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करायचे ही शेकापची दुटप्पी नीती आहे. हे चित्र आता बदलले पाहिजे. यांच्याशी सलगी करून नाही, तर संघर्ष करूनच त्यांना संपवायचे आम्ही ठरवले. आता आमची ताकद वाढली आहे. मुख्यमंत्री आम्हीच ठरवू, असे सांगणार्‍यांवर आता मते मागण्यासाठी गावागावात फिरण्याची वेळ आली आहे. यांना आता कायमचे संपवायचे आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत अलिबाग विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांना विजयी करा. अहंकारी शेकापचा रावण जाळा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी मतदारांना केले.

या मतदारसंघात काँग्रेस नेहमी शेकापशी लढत आली आहे. शेकाप-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी असताना  या मतदारसंघात काँग्रेसने उमेदवार दिला आहे. मैत्रीपूर्ण लढत आहे, असे सांगत आहेत. ही मैत्रीपूर्ण लढत कशासाठी, जनतेला हे सारे समजले आहे. काँग्रेसने आपला शत्रू कोण हे ठरवावे, असेही आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.

राज्यात भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार आल्यापसून आलिबाग विधानसभा मतदारसंघात अनेक विकासकामे झाली आहेत. जी कामे राज्य सरकारने मंजूर केली आहेत त्याचे श्रेय घेण्यासाठी शेकापची मंडळी धडपड करीत आहेत, मात्र शेतकर्‍यांच्या उत्पन्नातून दलाली खाणार्‍या शेकापच्या नेत्यांचा धंदा कायमचा बंद करणार आहोत. अलिबागमध्ये महायुतीचाच गुलाल उधळला जाणार आहे, असे भाजपचे अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते म्हणाले.

जयंत अंबाजी, अ‍ॅड. पल्लवी तुळपुळे, रायगड जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, अनंतराव देशमुख, विजय कवळे आदींची समयोचित भाषणे झाली. हेमंत दांडेकर यांनी प्रास्ताविक केले. संतोष पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर परशुराम म्हात्रे यांनी आभार मानले.

आपण निवडून आल्यानंतर युतीचा आमदार म्हणूनच काम करणार आहोत. जनतेची कामे करायची आहेत. त्यासाठी मला एक संधी द्या.

-महेंद्र दळवी, उमेदवार 

शेकापला संपविण्याची संधी वाया घालवू नका -अनंत गीते

भ्रष्टाचारी शेकापला जिल्ह्यातून कायमचे संपविण्याची ही संधी आहे. ती वाया घालवू नका. एकदिलाने काम करा. विधानसभा निवडणुकीत शेकापचा पराभव करा, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री, शिवसेना नेते अनंत गीते यांनी केले. पालकमंत्री रवींद्र चव्हाण व सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे भाजपची ताकद या जिल्ह्यात वाढली आहे. ज्याप्रमाणे अलिबागमध्ये भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी विजयी व्हावेत म्हणून काम करीत आहेत, त्याचप्रमाणे पेणमधील भाजपचे उमेदवार रवी पाटील यांना विजयी करण्यासाठी शिवसैनिक काम करणार आहेत, असेही गीते म्हणाले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नावेखाडीत शिवमंदिर जीर्णोद्धार सोहळा आणि श्रींची पुनःप्रतिष्ठापना

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील नावेखाडी मधलापाडा येथे शिवमंदिर जीर्णोद्धार आणि श्रींची पुनःप्रतिष्ठापना सोहळा माजी …

Leave a Reply