Breaking News

पराभवानंतरही विराट खूश

चौथ्या क्रमांकासाठी मिळाला भरवशाचा फलंदाज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
वेस्ट इंडिजविरुद्ध चेन्नईत झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा मोठा पराभव झाला, मात्र या पराभवातही भारतीय संघाला एक आशेचा किरण गवसला. त्यामुळे भारतीय संघाच्या कर्णधारास पराभवातही हायसे वाटले. मोठ्या कालावधीपासून भारतीय संघाची डोकेदुखी ठरलेल्या क्रमांक चारसाठीचा एक भरवशाचा फलंदाज टीम इंडियाला मिळाला आहे.
पहिल्या वन डेत वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी बोलावले. सलामीवीर लोकेश राहुल (6), त्यानंतर कर्णधार विराट कोहली (4) हे दोघे झटपट बाद झाले. त्यानंतर रोहित शर्मादेखील मोठी खेळी करू शकला नाही. आघाडीचे हे तीन फलंदाज बाद झाले तेव्हा भारताची अवस्था 3 बाद 80 अशी झाली होती. तेव्हा मैदानात श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत हे दोघे होते. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. यात श्रेयसने 88 चेंडूंत 70 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने संघाला गरज असताना अत्यंत संयमी खेळी केली.
भारताने 50 षटकांत उभ्या केलेल्या 288 धावसंख्येचे श्रेय श्रेयस अय्यर आणि पंत या जोडीला जाते. कारण या दोघांपैकी एक जरी फलंदाज बाद झाला असता, तर भारताला किमान लढत देण्यासाठीची धावसंख्या उभारता आली नसती. अय्यरने त्याच्या खेळीत 5 चौकार आणि एक षटकार मारला. त्याची चेन्नईतील वन डेतील खेळी पाहून भारतीय संघाची चौथ्या क्रमांकाची डोकेदुखी संपली असेच दिसत आहे. संघ जेव्हा संकटात होता तेव्हा विकेट न गमावता आणि धावफलक हलता ठेवत श्रेयसने शानदार खेळ केला. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेतदेखील चौथ्या क्रमांकावर खेळेल असा योग्य फलंदाज भारताकडे नव्हता.
चेन्नई वन डेत श्रेयसला वन डेमधील पहिले शतक झळकावण्याची संधी होती. अर्थात या सामन्यात अर्धशतकी खेळी करून त्याने वेस्ट इंडिजविरुद्धचे सलग तिसरे अर्धशतक केले. चेन्नईच्या आधी विंडीजविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेन येथे 71 आणि 65 धावांची खेळी केली होती. श्रेयस आठव्या षटकात मैदानात आला होता. त्याने प्रथम रोहित शर्मासोबत प्रथम तिसर्‍या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी केली. त्यानंतर पंतसोबत शतकी भागीदारी केली. पंतसोबत त्याने केलेल्या 114 धावांची भागीदारी भारतीय संघाच्या डावाला आकार देणारी ठरली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply