नवी दिल्ली : वृत्तसंस्था
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारे काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचा देशभरात निषेध होत आहे. राहुल यांच्याविरोधात रविवारी (दि. 15) अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली, तसेच त्यांनी या प्रकरणी माफी मागावी, अशी मागणी लावून धरण्यात आली. ‘माझे नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. त्यामुळे मी मरण पत्करेन, पण कदापि माफी मागणार नाही,’ असे वादग्रस्त वक्तव्य राहुल गांधी यांनी केले आहे. राहुल यांनी याआधीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यासही काँग्रेसने विरोध केला होता. आता पुन्हा एकदा राहुल यांनी सावरकरांबद्दल निंदनीय वक्तव्य केल्याने संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत अनेकांनी तीव्र प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
– कामोठ्यात भाजपचा एल्गार
पनवेल : रामप्रहर वृत्त
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद ठिकठिकाणी उमटत असून, कामोठे भाजपच्या वतीने रविवारी
(दि. 15) राहुल यांचा जाहीर निषेध करण्यात आला.
या वेळी पनवेल महापालिकेतील भाजपचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, विजय चिपळेकर, महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, नगसेविका अरुणा भगत, तसेच रवींद्र जोशी, प्रदीप भगत, राजेश गायकर, रमेश म्हात्रे,
सुशील शर्मा, हर्षवर्धन पाटील, चंद्रकांत कडू, महेंद्र भोपी, मणाजी पाटील, धीरज सिंग, अमित सावंत, तेजस जाधव, आदित्य भगत, अविनाश अहिवले, आकाश कवडे, जयश्री धापते, वैशाली जगदाळे, साधना आचार्य, फातिमा आलम आदी उपस्थित होते. सर्वांनी राहुल गांधी यांचा फलक दर्शवून निषेध केला, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.
– सत्तेसाठी किती लाचार व्हावे?
फडणवीसांचे टीकास्त्र; चहापानावर बहिष्कार
नागपूर : कालपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी प्रेम असणारे आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सावरकरांबाबतच्या वक्तव्यावर मवाळ भूमिका घेत आहेत. सत्तेसाठी किती लाचारी ठेवायची, असा सवाल करीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नाव न घेता टीकास्त्र सोडले. सावरकरांचा अपमान करणार्यांच्या मांडीला मांडी लावून जे बसलेत त्यांच्या चहापानाला जाणार नाही, असेही ते म्हणाले. नागपुरात सोमवार (दि. 16)पासून हिवाळी अधिवेशन सुरू होत असून, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. या वेळी सावरकरांचा अपमान करणार्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणार्या शिवसेनेवर फडणवीस यांनी शरसंधान साधले. इथे सौदेबाजी करण्याची आवश्यकता नाही. सत्तेच्या लाचारीमुळे सौदेबाजी करण्यात येत असून, त्यांची सौदेबाजी त्यांना लखलाभ, असे फडणवीस म्हणाले.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला आहे. गांधी हे आडनाव लावून कुणाला गांधी होता येत नाही, असा टोला फडणवीस यांनी या वेळी लगावला. राहुल यांना सावरकरांना मानावेच लागेल. ज्याप्रमाणे गांधी आणि नेहरूंना मानावेच लागते, त्याप्रमाणे सावरकरांनाही मानावेच लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणार्यांच्या मांडीला मांडी लावून जे बसलेत त्यांच्या चहापानाला आम्ही जाऊ शकत नाही, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी नाकर्त्या सरकारच्या चहापानावर भाजप बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर राहुल गांधी यांच्या विधानावर निषेधाचा प्रस्तावही मांडला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, या सरकारचे अजूनही खातेवाटप झालेले नाही. आम्ही जनतेचे प्रश्न कुणापुढे मांडणार, असा सवाल करीत हे सरकार शेतकर्यांबाबत अजून एकही शब्द बोललेले नाही. या सरकारमध्ये मंत्रीच नाहीत. आधी निर्णय घ्या, मग चर्चेला बोलवा आणि त्यानंतर आम्ही चहापानाला जाऊ.
– ’छे… छे… झुकली रे झुकली,
मराठी बाणा सांगणारी सेना झुकली!’
मुंबई : मराठी बाणा सांगणारी शिवसेना सत्तेसाठी काँग्रेससमोर झुकल्याची टीका भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून देशात सर्वत्र राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. यातच भाजपचे नेते शेलार यांनी ट्विट करीत सावरकरांच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.नाही धार ’सच्चाई’कारांच्या शब्दांना आज दिसली, ’रोखठोक’लेखणी त्यांच्याकडेच पाहून म्हणे हसली. सत्ता पाहा कशी आज सावरकरांच्या अपमानापेक्षा मोठी ठरली. नागू सयाजी वाडीतून का नाही महाराष्ट्र धर्माची उजळणी झाली? छे.. छे.. झुकली रे झुकली. मराठी बाणा सांगणारी सेना सत्तेसाठी काँग्रेससमोर झुकली!, असे बोलके ट्विट करीत शेलार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper