अब्जावधी डॉलर्सचा चोरटा बाजार असलेला अंमली पदार्थांचा व्यवसाय संपूर्ण जगात एक प्रकारे समांतर अर्थव्यवस्थाच चालवतो असे मानले जाते. न्यूयॉर्क, लंडन, मॉस्को, अॅमस्टरडॅम, म्युनिक, इस्तंबूल आणि काबूल अशा महानगरांमध्ये अंमलीपदार्थांच्या व्यवसायाने केव्हाच हातपाय पसरले आहेत. जगातील या महानगरांच्या नामावळीत आता मुंबईचाही समावेश होऊ लागला आहे. अंमलीपदार्थांचा विळखा पृथ्वीभोवती किती घट्ट आवळत चालला आहे याची शेकडो उदाहरणे जगाच्या कान्याकोपर्यात रोजच्या रोज दिसून येत असतात. अफू, गांजा, चरस, हेरॉइन, ब्राऊन शुगर, एलएसडी यांपासून ते नव्याने हातपाय पसरू लागलेल्या एमडी या अंमली पदार्थापर्यंत शेकडो पर्याय चोरट्या बाजारात उपलब्ध असून हा भस्मासूर तरुणाईला गिळंकृत करीत चालला आहे. अंमलीपदार्थांची तस्करी आणि त्याविरुद्ध देशोदेशी उघडल्या गेलेल्या पोलिसी मोहिमा यावर आधारित शेकडो चित्रविचित्र कहाण्या आपण वाचतो किंवा पाहातो. नार्कोटिक्स या एकमेव विषयाला वाहून घेतलेले शेकडो चित्रपट जगभर गर्दी खेचत असतात. अंमली पदार्थांचे आकर्षण सर्वांनाच असते असे नाही. परंतु त्याबद्दलचे सुप्त कुतुहल मात्र बहुतेकांच्या मनात असते. तस्करीसाठी वेगवेगळ्या युक्त्या अवलंबिल्या जात असताना आता नवीनच शक्कल उजेडात आली असून पोलिस देखील त्यामुळे बुचकळ्यात पडले आहेत. मुंबईत एका मध्यमवर्गीय घरात नुकतीच गांजाची शेतीच केलेली आढळून आली. पोलिसांच्या अंमलीपदार्थ विरोधी विभागाने तातडीने कारवाई करून या गुन्हेगार शेतकर्याला जेरबंद करण्यात यश मिळवले. मुंबईतील चाकरमानी माणसे घरातील सज्जामध्ये गुलाब, मोगरा, तुळस जोपासतात. थोड्या उच्च मध्यमवर्गीय घरांमध्ये कॅक्टस तसेच एखादे महागडे बोन्साय देखील दिसू शकते. परंतु वनस्पतीशास्त्राचा उपयोग अशा गुन्हेगारी शेतीसाठी होईल याचा अंदाज मात्र पोलिसांना आला नाही. कृषी विज्ञान आणि वनस्पतीशास्त्र यांचा संगम असलेले हायड्रोपोनिक नावाचे जैव तंत्रज्ञान वापरून माहुल गाव (चेंबूर) परिसरात एका घरामध्ये हे घरगुती शेत आढळून आले. चेंबूर, आरसीएफ, देवनार परिसरातून गांजा तसेच इतर ड्रग्ज पुरवले जात असल्याची खबर गुन्हा शाखेला मिळाली होती. त्यानुसार माहुल गावातून निखिल शर्मा नावाच्या एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले. या शर्मा नावाच्या 26 वर्षीय तरुणाने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या मित्राच्या घरी छापा टाकला असता गांजाचे घबाड पोलिसांना सापडले. गांजाची शेती करण्यासाठी लागणारे तीन हायड्रोपोनिक तंबू, गांजाचे बियाणे, हायड्रोपोनिक खते, टाइमर यंत्रणा, सॉइल टेस्टर असे सुमारे सहा लाखांचे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले. इंजिनीअरिंगचे शिक्षण पुरे न करु शकलेल्या या तरुणांनी ही सर्व सामग्री ऑनलाइन मागवली होती. ही गुन्हेगारी कथा एकंदरीतच मुंबईकरांसाठी अस्वस्थ करणारी आहे. अशा प्रकारच्या ‘विकृत स्टार्टअप’कडे दुर्लक्ष करून आपण नकळत खतपाणी घालतो आहोत या जाणीवेने प्रत्येक मुंबईकराने अंतर्मुख व्हावयास हवे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात अनेक सोसायट्यांमध्ये लाखो लोक राहतात. शेजारच्या घरामध्ये काय चालले आहे याची खबर आपल्याला अनेकदा नसते. घरात गांजाची लागवड करणे ही फार अभिनव गोष्ट नव्हे. अनेक ठिकाणी असे प्रकार यापूर्वीही आढळले आहेत. मुंबईत मात्र ही विषाची लागवड यशस्वी होऊ नये यासाठी समाज म्हणून आपणही दक्ष राहणे गरजेचे आहे.
Check Also
पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच
सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …