बर्लिन : वृत्तसंस्था
जगातील टॉप-30 खेळाडूंमध्ये समावेश असलेले 135 खेळाडू हे तीन युरोपीय देश आणि अमेरिकेत सुरू असलेल्या मॅच फिक्सिंगच्या चौकशीत संशयाच्या भोवर्यात सापडले आहेत. टॉप-30मधील एका पुरुष खेळाडूवर मॅच फिक्सिंगचा दाट संशय असल्याचे जर्मनीमधील प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त अहवालातही म्हटले आहे. संशयाच्या भोवर्यात सापडलेल्या या खेळाडूने तीन एटीपी टूर किताब जिंकले आहेत. आर्मेनियातील सट्टेबाजीमाफिया नेटवर्कचा हात या मॅच फिक्सिंगमध्ये असल्याचा खुलासाही या अहवालात करण्यात आला आहे, तसेच आम्ही आर्मेनियातील सट्टेबाजीमाफिया नेटवर्कबाबत चर्चा करीत आहोत. हे नेटवर्क युरोपमधील सात देशांमध्ये पसरले आहे. या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर अफरातफरी माजली आहे, असे गंभीर वक्तव्य बेल्जियमचे सरकारी फिर्यादी एरिक बिसचोप यांनी केले आहे. फिक्स करण्यात आलेल्या सामन्यांवर शेकडो छोटे छोटे सट्टे लावण्यात आले आहेत. यातील प्रत्येक सट्ट्यातून लाखो यूरोंची कमाई करण्यात आली, असा दावाही बिसपोच यांनी केला आहे.
अर्जेन्टिनाचा माजी खेळाडू मार्को ट्रुंगेलीटी याने आपल्याशी सट्टेबाजांनी संपर्क केल्याचे सांगितले असल्याचे ’झेडडीएफ’ आणि ’डाय वेल्ट’ने म्हटले आहे. पहिल्या 50मध्ये व्यावसायिक खेळाडूंनीही सामने फिक्स केल्याची माहिती ट्रुंगेलीटीने दिली आहे. हा प्रकार सर्व स्तरावर होत असल्याचेही त्याने सांगितले आहे, तथापि या वर्षी जानेवारीत स्पेनच्या पोलिसांनी एका अर्मेनियाच्या टोळीने केलेल्या मॅच फिक्सिंग प्रकरणाच्या तपासादरम्यान 15 लोकांना अटक केली. शिवाय अटक करण्यात आलेल्यांमध्ये स्पॅनिश टेनिसपटू मार्क फोर्नेल मेस्ट्रेसही होता, असाही दावा करण्यात आला होता.