सिडनी : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाचा संघ जानेवारी 2020मध्ये भारत दौरा करणार असून, या दौर्यात तीन एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत. यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 14 जणांचा संघ मंगळवारी (दि. 17)जाहीर केला. या संघात नवोदित प्रतिभावंत फलंदाज मार्नस लाबूशेनला संधी देण्यात आली आहे, तर या वर्षी झालेला आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत खेळलेल्या सात खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
2019च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघातील एकूण सात खेळाडूंना या संघातून वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचे नियमित मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनाही विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे या मालिकेत सहाय्यक प्रशिक्षक अॅण्ड्र्यू मॅकडोनाल्ड हे हंगामी मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
मानसिक ताणामुळे क्रिकेटमधून विश्रांती घेतलेल्या ग्लेन मॅक्सवेलने टी-20 क्रिकेटमधून पुनरागमन केले आहे, पण त्याला एकदिवसीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. याशिवाय 2019 विश्वचषकात संघातील उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, नॅथन कुल्टर नाईल, मार्कस स्टॉयनिस आणि नॅथन लायन यांनाही भारत दौर्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात संधी दिलेली नाही, तर जेसन बेहरेनडॉर्फ हा दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. ऑसी संघात नवोदित प्रतिभावंत फलंदाज मार्नस लाबूशेनला स्थान मिळाले आहे. त्यामुळे आता त्याला वन डे पदार्पणाची संधी मिळू शकते. त्याने ऑस्ट्रेलियाकडून कसोटीत खेळताना दमदार कामगिरी केली आहे. या वर्षी खेळलेल्या 10 कसोटी सामन्यांत त्याने 68.13च्या सरासरीने एक हजार 22 धावा केल्या आहेत.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 14 जानेवारीपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होईल. पहिला सामना 14 जानेवारीला मुंबईत, तर दुसरा आणि तिसरा सामने अनुक्रमे 17 आणि 19 जानेवारीला राजकोट आणि बंगळुरु येथे खेळला जाणार आहे. -ऑस्ट्रेलिया संघ : अॅरॉन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, पीटर हँड्सकोम्ब, अॅलेक्स कॅरे, पॅट कमिन्स, अॅश्टन टर्नर, मार्नस लाबूशेन, केन रिचर्डसन, जोश हेजलवूड, मिशेल स्टार्क, सीन अॅबॉट, अॅश्टन अगार, अॅडम झम्पा.